भारताचे प्रतिनिधित्व करेन अशी कधीही अपेक्षा केली नव्हती, असे उद्गार भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने काढले. छोटय़ा शहरातून आल्यामुळे मानसिकदृष्टय़ा कणखर झाल्याचे धोनीने सांगितले.भारतासाठी खेळेन असे मला कधी वाटले नाही. एखाद्या सामन्यासाठी किंवा मालिकेसाठी माझी निवड होईल का याची मला कधीही चिंता नसते. पुढच्या सामन्यात संघासाठी योगदान देणे हेच माझे लक्ष्य असते, असे धोनीने एका परिसंवादादरम्यान सांगितले.
रांचीतील दिवसांबाबत विचारले असता धोनी म्हणाला, अनेक लोक छोटय़ा शहरांतील क्रिकेटपटूंकडे तसेच त्यांच्या खेळाकडे लक्ष देत नाहीत. तुलनात्मक विचार करता रांचीमध्ये अनेक वरिष्ठ खेळाडू होते.
रांचीसारख्या छोटय़ा शहरातून कारकिर्दीची सुरुवात करणे नक्कीच कठीण आहे. पण त्यामुळेच अनेक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कणखरता अंगी बाणते, असे धोनीने सांगितले.
छोटय़ा शहरातील खेळाला आणि खेळाडूंना मिळणाऱ्या प्रसिद्धीची धोनीने प्रशंसा केली आहे. क्रिकेटव्यतिरिक्त गोष्टींसाठी कसा वेळ काढतोस, यावर धोनी म्हणतो, क्रिकेट हेच सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे. हे सोपे आहे. क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणे योग्य असते. जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी क्रिकेटचा हंगाम सुरू नसताना वेळ काढता येतो. त्या वेळी तुम्हाला क्रिकेटव्यतिरिक्त क्षेत्रातील मंडळीशी संवाद साधता येतो.
दररोज व्यायामशाळेत जाण्याबाबत आपण आग्रही नाही, सामना संपल्यानंतर मनाला वाटेल ते खातो, असेही धोनीने स्पष्ट केले. खाण्याच्या बाबतीत मी कोणतीही तडजोड करीत नाही, अशी टिप्पणीही धोनीने केली.
या परिसंवादाला अनिल कुंबळे, वीरेंद्र सेहवागसह भारताचे माजी प्रशिक्षक जॉन राइट उपस्थित होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2013 10:13 am