करोना व्हायरसमुळे संपूर्ण जगामध्ये हाहा:कार माजला आहे. भारतासह अनेक देशांमध्ये करोनाचे संक्रमण आणि प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. काही देश करोनामुक्त झाल्यानंतरही त्या देशांमध्ये पुन्हा करोनाची साथ आल्याचे दिसून आले. युरोप आणि अमेरिका खंडात तर या व्हायरसने खूप बळी घेतले आहेत. इंग्लंडलाही या भयानक विषाणूचा सामना करावा लागला आहे. तशातच इंग्लंडचे माजी अष्टपैलू खेळाडू इयन बोथमने यांनी एक मोठा दावा केला आहे. जानेवारी महिन्यातच मला करोनाची लागण झाली होती, पण मला वाटलं की तो फ्ल्यूचा ताप असेल, असे त्यांनी नुकतेच एका मुलाखतीत सांगितले.

“सहा महिन्यांपूर्वी या आजाराविषयी कुणालाच काही कल्पना नव्हती. या आजाराविषयी कधी ऐकलेदेखील नव्हते. पण त्यावेळी मला करोनाने ग्रासले होते. डिसेंबरच्या शेवटच्या टप्प्यात किंवा जानेवारीच्या सुरुवातीला मला या आजाराची लागण झाली होती. मला वाटलं की, हा एक विचित्र प्रकारचा फ्ल्यू आहे. पण तसं नव्हतं. मला करोना झाला होता आणि आता हळूहळू करोना जगभरात पसरला आहे”, असा दावा बोथम यांनी गुडमॉर्निंग ब्रिटनशी बोलताना केला.

इयन बोथम

“करोना म्हणजे एखाद्या अंधाऱ्या रात्रीसारखा आहे. पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पनाच येत नाही. अशा कठीण प्रसंगात लोकांनी करोनाचा सामना धीराने केला आहे. आणखी काही दिवस संयम बाळगा. काही दिवसांतच परिस्थिती पूर्वपदावर येइल अशी आशा आहे. परत लोक पूर्वीसारखे घराबाहेर पडतील. सध्या करोनामुळे क्रिकेटच्या सर्व मालिका अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यार आल्या आहेत. ८ जुलैपासून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे, पण क्लब क्रिकेट अजूनही बंदच आहे. लवकरच सर्व प्रकारचं क्रिकेट सुरू होऊ दे अशी आशा आहे”, असेही ते म्हणाले.