News Flash

खुदा गवाह!

‘बुजकशी’ हा शब्द जरी उच्चारला तरी ऐकणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात.

|| संतोष सावंत

‘बुजकशी’ हा शब्द जरी उच्चारला तरी ऐकणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात. अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, किरगिझस्तान अशा देशांतील पठाणी भागांमध्ये प्रामुख्याने ‘खुदा गवाह’ असे मानून हा साहसी खेळ खेळला जातो. ‘बुज’ म्हणजे बकरी आणि ‘कश’ म्हणजे खेचणे. हा खेळ घोडय़ावर बसून खेळला जातो. मैदानाच्या मधोमध ठेवलेले बकरीचे धड जो संघ अंतिम रेषेपर्यंत पोहोचवतो, तो जिंकतो, हे या खेळाचे पारंपरिक स्वरूप. असा हा ‘बुजकशी’चा डाव अफगाणिस्तान आणि भारत या दोन काफिल्यांमध्ये रंगणार होता. अफगाणिस्तानचा पारंपरिक काफिला की भारताचा अनुभवी काफिला..? या खेळात नेमका कोण बाजी मारणार, याची उत्सुकता अवघ्या जगाला लागून राहिली होती.

साऊदम्पटन खिंडीत शनिवारी जणू युद्धाचेच पडघम वाजत होते. वातावरणात ईर्षेचा दर्प मिसळलेला होता. वीरांच्या आरोळ्यांनी परिसर दणाणून सोडला होता. या साहसी खेळाचा रोमांच अनुभवण्यासाठी लोकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. दोन्ही गटांतील बलदंड खेळाडू आपापल्या घोडय़ांवर स्वार होऊन अंतिम इशाऱ्याची वाट पाहात होते. मैदानाच्या दोन टोकांना समोरासमोर असे हे दोन्ही काफिले उभे होते. मध्यरेषेवर एक विशाल सोनेरी चषक ठेवला होता. उंचपुरे आणि धिप्पाड असे हे वीर आपली वीरश्री दाखवण्यासाठी उतावीळ झालेले दिसत होते. सर्व खेळाडूंच्या हातात वजनदार भाले होते. त्यांचे संपूर्ण शरीर जरी कपडय़ांनी झाकलेले असले तरी आग ओकणारे डोळे मात्र झाकलेले नव्हते. या डोळ्यांनीच ते आपल्या प्रतिस्पध्र्याना अजमावत होते.

या वीरांइतकेच लक्ष वेधून घेत होते, ते त्यांचे डौलदार अरबी घोडे. या खेळात स्वाराइतकेच घोडेही महत्त्वपूर्ण मानले जातात. जणू स्वाराचे दुसरे अंगच. हे घोडे आवेगाने फुरफुरत होते, खिंकाळत होते. त्यांच्या नाकपुडय़ा रागाने थरथरत होत्या. खूर आपले कसब दाखवण्यासाठी आतुर झाल्याने एका जागी ठरत नव्हते. शेपटय़ा थरथरत होत्या. या जातिवंत जनावरांच्या अशा जोशपूर्ण हालचालींमुळे अवघ्या वातावरणातून ऊर्जेचा प्रवाह दौडत होता. प्रेक्षक बेभान होत होते. आता सारेच खेळ कधी सुरू होतो, याकडे डोळे लावून बसले होते.

इशारा झाला.. तसा एकच कोलाहल झाला. दोन्ही काफिले हातातले भाले तोलत मैदानाच्या मध्यरेषेकडे झेपावले. तिथे ठेवलेला तो सोनेरी चषक त्यांना आपल्या भाल्याच्या साहाय्याने अंतिम रेषेपलीकडे नेऊन ठेवायचा होता. एकच धुमश्चक्री उडाली. अफगाणिस्तानचा काफिला भारताच्या काफिल्यावर भारी पडतोय असे चित्र दिसू लागले. त्यांनी आपल्या दमदार खेळीने भारताच्या प्रमुख वीरांची नाकेबंदी करून टाकली होती. भारतीयांना आपले घोडे दौडवणेही दुरापास्त झाले होते. भारताच्या काफिल्याचा सरदार हा असा एकमेव वीर होता, जो त्यांना अजिबात जुमानत नव्हता. मग त्याला अडकवण्यासाठी सांघिक ताकदीचा अवलंब करण्यात आला. जाळे लावण्यात आले आणि अखेर या जाळ्यात तोही फसला. मध्यंतरापर्यंत अफगाणिस्तानच्या काफिल्याने आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत खेळावर पकड मिळवली होती. हा खेळ आपणच जिंकणार अशी मनोमन खात्री त्यांना वाटू लागली होती.

विश्रांतीनंतर खेळ पुन्हा सुरू झाला आणि दोन्ही काफिल्यांचे स्वार उधळले. आक्रमण आणि वेग यांची धार वाढली. एक काफिला इतिहास रचण्यासाठी तर दुसरा आपला नावलौकिक वाचवण्यासाठी धडपडू लागला. शर्थीचा खेळ सुरू झाला. विजयाचे पारडे कधी इकडे तर कधी तिकडे असे झुकू लागले. निर्णायक प्रहर सुरू झाला. अफगाणिस्तानचा काफिला भारताच्या वीरांना न जुमानता नेटाने अंतिम रेषेकडे सरकू लागला. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली. अचानक भारताचा एक वीर शमी या काफिल्याला निडरपणे आडवा आला. त्याने हे आक्रमण थोपवले. अद्वितीय पराक्रम गाजवत एकटय़ाने तीन वीर जायबंदी केले. त्यामुळे भारताचा काफिला विजयी ठरला. विजयाचे चौघडे वाजू लागले; परंतु अफगाणिस्तानच्या काफिल्याने आपल्या दमदार खेळाने प्रेक्षकांची मने जिंकली होती!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2019 11:08 pm

Web Title: icc cricket world cup 2019 6
Next Stories
1 क्रिकेटचा देव जसप्रीत बुमराहवर प्रसन्न ! अफगाणिस्तानविरुद्ध गोलंदाजीचं केलं कौतुक
2 पाकिस्तानी तोफखान्यासमोर आफ्रिकेचा गड ढासळला, शादाब-आमिर-वहाबचा भेदक मारा
3 World Cup 2019 : इम्रान ताहीरची गाडी सुसाट, पाकविरुद्ध सामन्यात विक्रमाची नोंद
Just Now!
X