|| संतोष सावंत

इंग्लंडमधील नामांकित पंचतारांकित हॉटेलचा डायनिंग हॉल उत्साहाने फसफसत होता. रंगीबेरंगी फॅशनेबल कपडय़ांतील जथे इकडून तिकडे सुळकन सरकत होते. पाश्र्वभूमीवर मंद संगीत वाजत होते. बांगलादेशचा क्रिकेट संघ याच हॉटेलमध्ये उतरला होता. त्यामुळे सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था होती. भिंतीलगतच्या एका शिसवी टेबलवर पिळदार शरीरयष्टीचा देखणा तरुण बसलेला होता. टॉम फोर्ड विण्डसर थ्री पीस सूट परिधान केलेल्या त्या तरुणाची प्रत्येक कृती डौलदार होती. त्याच्या दोन्ही बाजूला आपण हॉलीवूडच्या चित्रपटात पाहतो, तशा कमनीय बांध्याच्या गौरवर्णीय सौंदर्यवती बसलेल्या होत्या. आपल्या हाताने त्या त्याला रंगीत द्रव्य पाजत होत्या. तोही आनंदाने त्याचा आस्वाद घेत होता.

..तेवढय़ात गडबड उडाली. बांगलादेशचा संघ जेवणासाठी आला होता. दक्षिण आफ्रिकेसारख्या मातबर संघावर केलेली मात आणि न्यूझीलंडच्या संघाला दिलेली झुंज यामुळे त्यांची चांगलीच हवा झाली होती. उपस्थितांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. वरवर पाहता तो झिंगलेला तरुण त्या युवतींशी संवाद साधत होता, पण त्याची चित्त्यासारखी नजर संघामधील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून फिरत होती. त्याने आपल्या खिशातून मोबाइल काढला. पासवर्ड टाकला आणि एक छायाचित्र स्क्रिनवर दिसू लागले. बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मोर्तझा होता तो. मोबाइल पुन्हा खिशात टाकत असताना त्याने कोटाच्या आड दडवलेले अत्याधुनिक पिस्तूल चाचपून पाहिले.

दोघींनी त्याच्याकडे सहेतुक पाहिले. त्याने मानेने होकार दिला. त्याची आज्ञा मिळताच त्या उठून निघून गेल्या. जाताना एकीने समोरच्या टेबलवर बसलेल्या दोन दणकट शरीरयष्टीच्या पोलीस अधिकाऱ्यांना गुपचूप इशारा केला. त्यापैकी एक उठून त्याच्याकडे आला. आपले ओळखपत्र त्याच्या समोर धरत त्याने त्याला सोबत चलण्याचा इशारा केला. तो उठून उभा राहिला आणि त्याचा मोबाइल वाजू लागला. प्रायव्हेट नंबर स्क्रिनवर झळकत होता. ‘‘यस युवर हायनेस. मी त्याच कामगिरीवर आहे!’’ एवढे बोलून त्याने फोन ठेवला. जाताना त्याने आपली ओळख त्या अधिकाऱ्याला करून दिली. ‘‘बॉण्ड, जेम्स बॉण्ड.. एजंट ००७!’’ आता आश्चर्यचकित होण्याची पाळी त्या अधिकाऱ्याची होती.

शनिवारी होणाऱ्या सामन्यात बांगलादेशची नेमकी काय योजना असणार? याची माहिती काढण्याची नाजूक जबाबदारी दस्तुरखुद्द राणीसाहेबांनी बॉण्डवर टाकली होती. कोणत्याही परिस्थितीत हा विश्वचषक जिंकायचाच असा चंगच इंग्लंडने बांधला होता. जेम्स आपल्या जागेवरून उठला आणि सरळ मश्रफी मोर्तझा ज्या टेबलवर बसला होता, त्याच्या अगदी जवळच्या टेबलवर जाऊन बसला. सर्व जण हास्यविनोद करत बोलत होते. त्यांचा शब्द न् शब्द त्याला ऐकू येत होता, पण कळत नव्हता. कारण ते बंगाली भाषेत बोलत होते. त्याने आपल्या घडय़ाळातील रेकॉर्डर ऑन केला. आता त्यांच्या बोलण्याचा अर्थ लावणे त्याला सोपे जाणार होते.

सकाळी साडेसहा वाजताच कार्डिफ वेल्स स्टेडियमच्या कॉन्फरन्स रुममध्ये इंग्लंडचा संपूर्ण संघ प्रशिक्षकांसह हजर होता. मॅच सुरू व्हायला अजूनही तीन तास होते. सुरक्षेच्या कारणास्तव राणीसाहेब प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नव्हत्या, परंतु मिनिटामिनिटाची खबर त्यांना पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पाचच मिनिटात मि. जेम्स बॉण्ड आले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली, ‘‘गेले ४८ तास मी ‘टायगर्स’ नावाने प्रसिद्ध असलेल्या बांगलादेशच्या संघावर लक्ष ठेवून आहे. हा संघ अजूनही युवावस्थेत आहे, पण या संघामध्ये क्रिकेट भिनलेले आहे. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध व्यूहरचना हेदेखील आखतात. परंतु त्यांची मदार असते ती क्रिकेटवरील प्रेमावर, निष्ठेवर!.. आणि म्हणूनच जगातील कोणत्याही संघाला चकित करण्याची क्षमता त्यांच्यात आहे.’’

‘‘मि. बॉण्ड, त्यांची इंग्लंडविरुद्ध सामन्याची योजना काय आहे?’’ ईऑन मॉर्गनने न राहवून विचारलेच.

‘‘जोदी आपनी हारते भॉय पान, ताहोले कॉखनोयी जेतार आशा राखबेन ना!’’ बॉण्डने बंगालीत उत्तर दिले. ज्याचा अर्थ होता, जर तुम्हाला हरण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची आशाच सोडा.