विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये सध्या अनेक रंजक लढती पाहायला मिळत आहेत. तशीच एक रंजक लढत मंगळवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. पण या सामन्याआधी इंग्लंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉय हा दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीला मुकणार आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर हा सामना होणार असून इंग्लंडच्या दृष्टीने स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हा विजय महत्वाचा आहे.

विंडीजविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडच्या संघाचा सलामीवीर जेसन रॉय हा स्नायूंच्या दुखापतीमुळे जायबंदी झाला होता. त्यामुळे अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन संघांविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यांना त्याला मुकावे लागले होते. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही तो तंदुरुस्त झाला नसल्यामुळे त्याला सांघाबाहेर राहावे लागणार आहे.

सराव सत्राच्या वेळी जेसन रॉय नेटसमध्ये सराव करण्यासाठी आला. दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो प्रथमच नेट्समध्ये सरावासाठी उतरला होता. त्यानंतर त्याच्या दुखापतीबाबत दुसऱ्यांदा तपासणी करण्यात आली. त्यात तो दुखापतीतून झटपट सावरत असल्याचे दिसून आले. पण सामना खेळण्यासाठी तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे संगणयत येत आहे. त्याच्या या दुखापतीमुळे सध्या जेम्स व्हिन्स हा संघात सलामीवीर म्हणून भूमिका पार पाडतो आहे. पण रॉयच्या दुखापतीच्या दुसऱ्या स्कॅन नंतर तो भारताविरुद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यात पुनरागमन करू शकतो अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

जेसन रॉय हा इंग्लंडचा प्रतिभावान खेळाडू आहे. World Cup 2019 स्पर्धेत त्याने ४ सामन्यांत ३ डावांत फलंदाजी केली. त्या ३ डावात त्याने २१५ धावा केल्या. त्यात एका शतकाचा समावेश आहे.