विश्वचषक स्पर्धेत यजमान इंग्लंडला तुलनेने दुबळ्या समजल्या जाणाऱ्या श्रीलंकेने पराभवाचा धक्का दिला. लसिथ मलिंगाचा भेदक मारा आणि त्याला धनंजय डि-सिल्वाच्या फिरकीने दिलेल्या साथीच्या जोरावर श्रीलंकेने इंग्लंडला २० धावांनी पराभूत केले. इंग्लंडकडून बेन स्टोक्स आणि जो रुटने अर्धशतकी खेळी करत संघाला विजयपथापर्यंत आणून सोडण्याचा प्रयत्न केला, मात्र लंकेच्या माऱ्यासमोर त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. इंग्लंडला २१२ धावांवर रोखत श्रीलंकेने धक्कादायक विजयाची नोंद केली. त्यामुळे आता इंग्लंड संघाच्या मदतीला तेंडुलकर धावून आला आहे.

सचिन तेंडुलकर हे क्रिकेटमधील मोठे नाव आहे. सचिनकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे. पण सध्या इंग्लंडचा संघ हा नेट्समध्ये सराव करताना सिनिअर तेंडुलकरकडून नव्हे, तर ज्युनिअर तेंडुलकर म्हणजेच अर्जुन तेंडुलकर याची मदत घेत आहेत. इंग्लंडचा मंगळवारी ऑस्ट्रेलियाबरोबर सामना रंगणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडच्या संघाने थेट अर्जुन तेंडुलकरची नेट्समध्ये मदत घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकून उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी इंग्लंडचा संघ कसून सराव करत आहे. हा सामना जिंकण्यासाठी त्यांनी आपल्या नेट्समध्ये थेट अर्जुन तेंडुलकरला पाचारण केले आहे. अर्जुन तेंडुलकर हा सध्या इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळत असल्याने इंग्लंडच्या संघाने त्याला बोलावले असल्याचे सांगितले जात आहे.

यजमान इंग्लंडचे सध्या तीन सामने उरले आहेत. पण महत्वाचे म्हणजे हे तिन्ही सामने तुल्यबळ संघाशी होणार आहेत. या तीनही सामन्यात इंग्लंडला ‘कांटे कि टक्कर’ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंग्लंडला जर विश्वचषकातील आव्हान कायम ठेवायचे असेल, तर त्यांना दमदार कामहीरी करावी लागणार आहे. सध्या इंग्लंडचे सहा सामन्यांमध्ये आठ गुण आहेत. त्यामुळे जर यापुढील तिन्ही सामने इंग्लंडने गमावले, तर त्यांना विश्वचषकातून बाहेर पडावे लागेल.