|| चंद्रकांत पंडित

विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाला चारीमुंडय़ा चीत करून भारताने जगज्जेतेपदाच्या प्रबळ दावेदाराला साजेशी कामगिरी केली. या विजयाद्वारे भारताने अन्य संघांना त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

भारतीय खेळाडूंचे कौतुक यासाठी करावे लागेल. कारण जेव्हा कोणताही संघ विदेशात जाऊन खेळतो, तेव्हा खेळाडूंना तेथील वातावरणाशी, खेळपट्टय़ांशी एकरूप होण्याकरिता थोडा वेळ लागतो. मात्र आपण पहिल्याच सामन्यात जवळपास तिन्ही आघाडय़ांवर वर्चस्व गाजवले. मुख्य म्हणजे आफ्रिकेच्या फलंदाजांना स्विंग होणाऱ्या खेळपट्टय़ांवर खेळण्याची अधिक सवय असते, तरीही आपल्या गोलंदाजांनी त्यांची भंबेरी उडवली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमरासारखा गोलंदाज तीन तीन स्लीप लावून गोलंदाजी करताना तुम्हाला क्वचितच पाहायला मिळेल. त्याशिवाय इतिहास पालटून पाहिल्यास इंग्लंडमध्ये खेळताना आपण कधीही दोन मनगटी फिरकीपटूंसह खेळताना आढळलेलो नाही. मात्र आपल्या कुलदीप यादव आणि यजुर्वेद्र चहल यांनी कमाल केली. त्यामुळे पुढील सामन्यांच्या दृष्टीने ही अनुकूल बाब आहे.

फलंदाजीविषयी बोलायचे झाल्यास रोहित शर्माची जितकी प्रशंसा करावी तितकी कमी आहे. मुख्य म्हणजे विश्वचषकाच्या पहिल्याच लढतीत रोहितसारख्या फलंदाजाने सलामीपासून अखेपर्यंत नाबाद राहून संघाला सामना जिंकून दिल्यामुळे अन्य फलंदाजांवरील दडपण कमी झाले असेल. अन्यथा धावांचा पाठलाग करताना बहुतांश वेळा विराट कोहली अथवा महेंद्रसिंह धोनी यांवरच आपण सर्वाधिक अवलंबून असतो, मात्र आता यामध्ये आणखी एका खेळाडूची वाढ झाली असून भारतासाठी ही जमेची बाजू आहे.

गेल्या काही वर्षांत भारतीय वेगवान गोलंदाजांची सर्वोत्तम फळी उदयास आली असून इतर संघांच्या तुलनेत ती अधिक समतोल आहे. आपले वेगवान त्रिकुट कोणत्याही क्षणी बळी मिळवू शकते. तसेच दोन फिरकीपटू, दोन अष्टपैलूसुद्धा बळी मिळवण्यात सक्षम आहेत. त्यामुळे कोहलीला गरजेनुसार कोणताही गोलंदाज वापरण्याचा पर्याय मिळतो. आफ्रिकेकडे फक्त ताहिरच बळी मिळवण्यालायक फिरकीपटू होता. त्यामुळे त्यांना भारतीय फलंदाजांना रोखणे कठीण गेले. कोहलीच्या नेतृत्वगुणांचेही कौतुक करावयास पाहिजे, कारण कर्णधार हा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर ५० टक्के सामना जिंकून देऊ शकतो. इंग्लंडच्या खेळपट्टय़ांवर फिरकी गोलंदाजाचा त्याने शिताफीने उपयोग केला.

चौथ्या क्रमांकावरील फलंदाज कोण, याचे उत्तरही आता मिळाले असल्याने लोकेश राहुलनेच संपूर्ण विश्वचषकात या क्रमांकावर फलंदाजी करावी. राहुलच्या तुलनेत दक्षिणेकडील विजय शंकर हा अष्टपैलू खेळाडू असला तरी चौथ्या क्रमांकासाठी तो योग्य पर्याय नाही, असे मला वाटते. त्याच्याकडे अनुभवसुद्धा कमी असून विश्वचषकात आपण त्याला चौथ्या स्थानावर खेळवण्याचा धोका पत्करू शकत नाही. आपली फलंदाजी प्रामुख्याने रोहित, शिखर व कोहली या पहिल्या तीन फलंदाजांवर अवलंबून आहे, मात्र एखाद्या सामन्यात हे तिघेही अपयशी ठरल्यास राहुल संघाला नक्कीच सावरू शकतो. एखाद्या खेळाडूची कामगिरी साधारण झाली तरी त्याला पाठिंबा देणे कर्णधाराचे काम असते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही कोहलीने आफ्रिकेविरुद्धच्याच ११ खेळाडूंसह मैदानात उतरण्यास प्राधान्य द्यावे, अन्यथा अनावश्यक बदल संघासाठी घातक ठरू शकतात.

गेल्या काही महिन्यांपासून सगळीकडे हार्दिक पंडय़ा आणि बुमरा या दोघांचीच चर्चा सुरू आहे. निश्चितच या दोघांनी केलेल्या कामगिरीमुळे विश्वचषकात त्यांना भारताचे हुकमी एक्के मानण्यात येत आहे. मुख्यत्वे बुमराने पहिल्याच सामन्यात याचा उत्तन नमुना पेश करत आफ्रिकेला सुरुवातीलाच हादरे दिले. त्याशिवाय मध्य षटकांतही तो चांगली कामगिरी करू शकतो आणि अखेरच्या षटकांत त्याच्यासारखा टिचून मारा करणारा गोलंदाज सध्या तरी कोणीच नाही, हे वेगळे सांगायला नको. हार्दिकच्या गोलंदाजीवर आपण फार अवलंबून राहू शकत नाही, मात्र फलंदाजीत तो नक्कीच सामना फिरवण्याची क्षमता बाळगून आहे.

भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज हे चार संघ उपांत्य फेरी गाठतील, असे मला वाटते. मात्र क्रिकेट हा बेभरवशी खेळ असल्याने कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. परंतु भारत-इंग्लंड यांच्यात अंतिम सामना व्हावा अशी माझी इच्छा आहे.