|| सिद्धार्थ खांडेकर

ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार आणि विख्यात क्रिकेट समालोचक इयन चॅपेल आज समाधानी असतील. काही दिवसांपूर्वी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल, असे भाकीत त्यांनी वर्तवले होते. त्याचबरोबर, ही क्रिकेटसाठी अत्यंत कंटाळवाणी बाब असेल, असेही त्यांनी बजावले होते. ऑस्ट्रेलिया आणि भारत ही क्रिकेटमधील प्रभाव केंद्रे आहेत. या दशकात दोन्ही देश विश्वविजेते राहिलेले आहेत. शिवाय दोहोंकडे पैसा, व्यवस्था भरपूर आहे. तेच पुन्हा अंतिम फेरीत खेळणे यातून क्रिकेटच्या दृष्टीने प्रोत्साहनपर काहीच घडण्यासारखे नाही, असे त्यांनी लिहिले. पण सुदैवाने यंदा क्रिकेटला नवीन विश्वविजेता मिळणार, कारण इंग्लंड आणि न्यूझीलंड असे दोन संघ अंतिम फेरीत आहेत, ज्यांनी ही स्पर्धा आजवर कधीही जिंकलेली नाही.

यंदाच्या स्पर्धेत अवघे दहा संघ खेळले. कधी १६, कधी १४, कधी १२ असे करत हा आकडा आता दहावर स्थिरावला आहे. १९७५पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आजवर २० संघांनी भाग घेतला. वेस्ट इंडिज, पूर्व आफ्रिका हे संघ राष्ट्रसमूह म्हणून खेळतात किंवा खेळले. तेव्हा प्रत्यक्षात २५-२६ देश खेळले असे मानले, तरी ४४ वर्षांमध्ये हा आकडा खूपच तोकडा आहे. असे होण्याचे कारण क्रिकेट अधिकाधिक देशांमध्ये पोहोचत नाही हे नसून, मोजक्या क्रिकेट मंडळांना हा खेळ वाढण्यात किंवा विस्तारण्यात काडीमात्र रस नाही हे आहे! क्रिकेटच्या लहानशा विश्वातही ‘बाहेरचे’ म्हणून हिणवले जाणारे संघ किती रंगत निर्माण करू शकतात, हे १९८३पासून काही स्पर्धामध्ये झिम्बाब्वेने, १९९६ ते २००३ या काळात केनियाने आणि २०११, २०१५मध्ये आर्यलडने खणखणीतपणे दाखवून दिले आहे! आज या संघांची काय स्थिती आहे? झिम्बाब्वे कसोटी वर्तुळाबाहेर फेकला गेला आहे. आर्यलड कसोटी संघ असला तरी, विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी त्याला पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागतो. केनिया तर क्रिकेटमधून जवळपास नामशेष झाला आहे. उद्या अफगाणिस्तानवरही हीच वेळ येणार हे उघड आहे.

नवोदित संघांच्या सामन्यांना मैदानांवर किंवा टीव्ही प्रक्षेपण बाजारपेठेत उठाव नाही, हे कारण हल्ली दिले जाते. त्यामुळे अशा संघांना खेळवून स्पर्धेचा दर्जा कमी होऊ  द्यायचा नाही असे धोरण आहे, जे निर्दयी आणि निष्ठुर आहे. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, अगदी न्यूझीलंड हे संघही या स्पर्धेत वेगवेगळ्या टप्प्यावर रटाळ आणि सुमार क्रिकेट खेळलेले आहेत. इंग्लंड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका हे जुनेजाणते संघ कधीही विश्वचषक जिंकू शकले नव्हते. त्यांना तरीही संधी मिळतेच ना? या दशकभरातील तिन्ही विश्वचषक स्पर्धा भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या प्रभावी मंडळांच्या आधिपत्याखाली भरवल्या गेल्या आहेत. या तिन्ही देशांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीवरील पकड ढिली होऊ  द्यायची नाही. त्यामुळे या संघटनेला अधिकाधिक अभिजनवादी किंवा एलिटिस्ट बनवण्याकडे तिन्ही मंडळांचा कल दिसतो. यंदाची स्पर्धा जुलै/ऑगस्टमध्ये भरवता आली असती. पण त्या काळात अ‍ॅशेस होताहेत! स्पर्धा आणखी अलीकडे भरवता आली असती, पण त्या काळात आयपीएल होती! या दोन्ही स्पर्धा/मालिकांचे महत्त्व भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या मंडळांच्या दृष्टीने विश्वचषकापेक्षा अधिक आहे.

या संकुचित दृष्टिकोनातूनच विश्वचषक विस्तारवाढीविषयी उदासीनता दिसून येते. फुटबॉलची बातच सोडा, पण रग्बी आणि हॉकीतही अधिकाधिक देश खेळू लागले आहेत. हॉकीत भारत, पाकिस्तान, अगदी ऑस्ट्रेलिया या पारंपरिक बलवान संघांची सद्दी बेल्जियम, अर्जेटिना, स्पेन यांनी मोडून काढलेली दिसते. संधी आणि पाठबळ मिळाल्यास नैसर्गिक गुणवत्तेचा विकास नक्की होतो हे क्रिकेटमध्ये भारत, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर दाखवून दिले आहे. अशी संधी चांगली गुणवत्ता असलेल्यांना मात्र नाकारण्याचा किंवा मर्यादित प्रमाणात ठरावीक काळासाठी उपलब्ध करण्याचा हा अवसानघातकी खेळ थांबवण्याची गरज आहे. क्रिकेटने वैश्विक नियमानुसार विस्तारण्याची गरज आहे. त्याऐवजी क्रिकेटमधील मोजक्यांनी जन्माला घातलेले लोभाचे कृष्णविवर एकेका संघाला गिळंकृत करत सुटले आहे. त्यातून हा खेळ स्वत:मध्येच अंतर्धान पावण्याचा धोका संभवतो!