कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांचा ओढा वाढवण्यासाठी आयसीसीने अखेर महत्वपूर्ण बदलाला मान्यता दिलेली आहे. यापुढे वन-डे आणि टी-20 क्रिकेटप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्येही खेळाडूंच्या पोशाखामागे त्यांचं नाव व क्रमांक लिहीला जाणार आहे. 1 ऑगस्टपासून ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात सुरु होणाऱ्या Ashes कसोटी मालिकेपासून हा बदल केला जाणार आहे.

१८७७ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात खेळाडूंच्या पोशाखावर नाव आणि क्रमांक टाकले होते. मात्र यानंतर आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एकच पद्धत चालत आलेली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या पोशाखावर त्याचं नाव लिहीलेलं नसल्यामुळे अनेकदा सामन्यादरम्यान, त्यांना ओळखण कठीण होऊन बसतं. त्यामुळे कसोटी क्रिकेटकडे प्रेक्षकांना पुन्हा खेचून आणण्यासाठी करण्यात आलेल्या शिफारसीला आयसीसीने हिरवा कंदील दाखवलेला आहे.

आयसीसीने कसोटी क्रिकेटला प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. दिवस-रात्र कसोटी सामना, गुलाबी चेंडूचा वापर यानंतर आयसीसीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची घोषणाही करण्यात आलेली आहे. त्यातच या नवीन बदलाला मान्यता दिल्यामुळे कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांची पावलं वळतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.