आयसीसी वन-डे क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या संघाची घसरण झालेली आहे. इंग्लंडविरुद्ध ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेत पहिले २ सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ वन-डे क्रमवारीत सहाव्या स्थानावर फेकला गेला आहे. आयसीसीने यासंदर्भातली ताजी क्रमवारीत नुकतीच जाहीर केली आहे. गेल्या ३४ वर्षांमधला ऑस्ट्रेलियाचा क्रमवारीतला हा सर्वात मोठा निच्चांक ठरला आहे. याआधी १९८४ सालात ऑस्ट्रेलियाच्या संघावर अशीच वेळ आलेली होती.

इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या सामन्यात आम्हाला विजयाची संधी होती, मात्र आम्ही मैदानात शंभर टक्के खेळ केला नाही. मोक्याच्या क्षणी पडलेल्या विकेट आणि मोठ्या भागीदारीचा अभाव यामुळेच आम्हाला पराभव पत्करावा लागल्याचं, ऑस्ट्रेलियन खेळाडू शॉ़न मार्शने सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदते सांगितलं. बॉल टॅम्परिंग प्रकरणात स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बँक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकलेला नाहीये.

क्रमवारीत आपलं स्थान सुधारण्यासाठी ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्धचे सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या या सुमार कामगिरीचा फायदा पाकिस्तानच्या संघाला झालेला दिसतोय. पाकिस्तानचा संघ पाचव्या स्थानावर पोहचला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा वन-डे सामना १९ जूनरोजी खेळवला जाणार आहे.