विश्वातील अव्वल तीन खेळांमध्ये स्थान मिळवणाऱ्या क्रिकेटचा पुन्हा एकदा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पुढाकार घेतला आहे. ‘आयसीसी’ने संबंधित देशांकडून याद्वारे होणाऱ्या नफ्याचा अहवाल मागवला आहे.

क्रिकेटच्या ऑलिम्पिकमधील पुनरागमनासाठी ‘आयसीसी’ने नेहमीच पावले उचलली आहेत. २०१८मध्ये ‘आयसीसी’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार ८७ टक्के चाहत्यांनी क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याला होकार दर्शवला होता. लोकप्रियतेच्या शर्यतीत फुटबॉल आणि बास्केटबॉलनंतर क्रिकेटचा तिसरा क्रमांक लागतो. परंतु ऑलिम्पिकमध्ये या खेळाचे दर्शन चाहत्यांना एकदाच झाले आहे. यापूर्वी १९००मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा एकमेव सामना खेळवण्यात आला होता. त्यावेळी ग्रेट ब्रिटन संघाने फ्रान्सचा १५८ धावांनी धुव्वा उडवून सुवर्णपदक पटकावले होते.

एका इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, ‘आयसीसी’ने संलग्न सदस्यांना प्रश्नावली पाठवली असून क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये कायमस्वरूपी समावेश केल्यास कशाप्रकारे आर्थिक लाभ होईल, याविषयी उत्तरेही मागवली आहेत. २ नोव्हेंबपर्यंत सर्व सदस्यांनी याविषयीचा अहवाल ‘आयसीसी’कडे सुपुर्द करावयाचा आहे.

‘‘आयसीसीने अद्याप २०२३ या वर्षांपासूनचा कार्यक्रम आखलेला नाही. त्यामुळे २०२४ अथवा २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी ‘आयसीसी’ प्रयत्नशील आहे. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन सदस्यांचा यासंबंधीचा दृष्टिकोन सर्वाधिक महत्त्वाचा ठरेल,’’ असे ‘आयसीसी’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले. टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुढील वर्षी रंगणार असून त्यापूर्वी क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होणे अशक्य आहे. २०२४मध्ये पॅरिस, तर २०१८मध्ये लॉस एंजेलिस येथे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.