कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला असला तरीही गुणतालिकेत भारत आपलं पहिलं स्थान राखून आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणावामुळे, आयसीसीने या स्पर्धेत भारत-पाक सामन्याचं आयोजन करणं टाळलं आहे. मात्र पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूस याने, भारत-पाक कसोटी सामन्याशिवाय या स्पर्धेला अर्थ नसल्याचं म्हटलं आहे.

“मला माहिती आहे, भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. माझ्यामते आयसीसीने याठिकाणी मध्यस्थी करायला हरकत नव्हती. कारण माझ्यासाठी भारत-पाक सामन्याशिवाय कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला काहीच अर्थ उरत नाही.” वकार स्थानिक यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता. मुंबईत २००८ झाली झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-पाक संघामध्ये क्रिकेट मालिका खेळवली जात नाहीये. काही दिवसांपूर्वी माजी भारत-पाक खेळाडूंनी दोन देशांमधील क्रिकेट मालिका पुन्हा सुरु होण्यास काहीच हरकत नसल्याचं म्हटलं आहे.

यावेळी बोलत असताना वकार युनूसने भारतीय गोलंदाजांचं विशेष कौतुक केलं. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा हे गोलंदाज गेल्या काही सामन्यांमध्ये भन्नाट कामगिरी करत असल्याचं वकार म्हणाला. बीसीसीआय खेळाडूंना संधी देण्याच्या बाबतीत योग्य पावलं उचलत असल्यामुळे सध्या भारतीय क्रिकेट संघ चांगली कामगिरी करत असल्याचंही वकारने नमूद केलं. सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआय आणि अन्य क्रिकेट बोर्डांनी महत्वाच्या स्पर्धा काहीकाळासाठी रद्द केल्या आहेत.