वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत धडक देणाऱ्या भारताच्या महिला संघावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने महिला संघासाठी व्हिडीओ पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. ‘तुम्ही करुन दाखवाल’ असा विश्वास व्यक्त करत विराटने महिला संघाला फायनलसाठी शुभेच्छा दिल्या.

मिताली राजच्या नेतृत्वाखाली इंग्लंडमध्ये गेलेला भारतीय संघ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. आज (रविवारी) लॉर्ड्स मैदानावर रंगणाऱ्या या फायनलकडे देशभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. फायनलपूर्वी महिला संघावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड करुन महिला संघाला शुभेच्छा दिल्या.व्हिडीओत विराट म्हणतो, मी महिला संघाला फायनलसाठी शुभेच्छा देतो. मिताली राजच्या नेतृत्वाखाली संघाने वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तुमची कामगिरी प्रेरणा देणारी आहे. गेल्या काही वर्षांत तुम्ही चांगली कामगिरी करुन देशाला मानाचे स्थान मिळवून दिले. संघातील सर्व खेळाडूंनी वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली आहे असे त्याने म्हटलंय.

वीरेंद्र सेहवागनेही शुभेच्छा दिल्या आहेत. ‘भारताच्या पुरुष संघालाही जी कामगिरी जमली नाही ती कामगिरी महिला संघाने करुन दाखवली आहे. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचा भारताने पराभव केला. आता फायनलमध्येही तुम्ही अशीच कामगिरी करुन दाखवा असे सेहवागने म्हटले आहे.

लॉर्ड्स मैदानावर होणारा हा सामना भारतासाठी ऐतिहासिक आहे. याच मैदानात भारताने १९८३ साली विंडीजचे वर्चस्व झुगारत वर्ल्डकपवर नाव कोरले होते. आता त्याच मैदानात महिलांचा भारतीय संघ इतिहास घडवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.