विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माचे शतक आणि लोकेश राहुल, कर्णधार विराट कोहलीच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने त्रिशतकी मजल मारली. ५ गड्यांच्या मोबदल्यात भारतीय संघाने ३३६ धावा केल्या आणि सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला ३३७ धावांचे आव्हान दिले.

या सामन्यात एक बाब पाहायला मिळाली. मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर विराट कोहली ७७ धावांवर खेळत होता. त्यावेळी आमिरने १ बाऊन्सर चेंडू फेकला. त्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या उद्देशाने विराटने बॅट फिरवली पण त्याचा फटका फसला. त्यानंतर पाकिस्तानच्या संघाने अपील केले. यात महत्वाचे म्हणजे पंचांनी त्याला बाद ठरवण्याच्या आधीच तो माघारी परतला. याहून आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे स्निको मीटरमध्ये चेंडू विराटच्या बॅटला स्पर्श न करता गेल्याचे दिसून आले. त्यामुळे विराट बाद की नाबाद अशी चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसून आली.

हा पहा व्हिडीओ –

विराटने ७७ धावा केल्या. त्यात ७ चौकारांचा समावेश होता. कोहली बाद होऊन माघारी परतला त्याआधी काही काळ पावसामुळे सामना थांबला होता. सामना पुन्हा सुरु झाल्यानंतर विराट लगेचच बाद झाला. विराट स्वतःहून मैदान सोडून निघून गेल्यामुळे अनेक चाहत्यांनी नाराजी दर्शवली. इतकेच नव्हे तर विराटला चूक लक्षात आल्यावरही त्याने पश्चात्ताप व्यक्त केला.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, भारतीय फलंदाजांच्या आक्रमक खेळापुढे पाकिस्तानचे गोलंदाज पुरते हतबल झाले. नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय पुरता फसला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची शतकी भागीदारी केली. यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपली अर्धशतकं पूर्ण केली. वहाब रियाझने लोकेश राहुलचा अडसर दूर करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर रोहित शर्माने कर्णधार विराट कोहलीच्या सोबतीने संघाचा डाव सावरला.

दोन्ही खेळाडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारीही झाली. अखेरीस रोहित शर्मा हसन अलीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने १४० धावांची खेळी केली. यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत विराट भारताच्या धावसंख्यात भर घातली. पांड्या माघारी परतल्यानंतर धोनीही अवघी एक धाव काढून माघारी परतला. अखेरीस धोनीने विजय शंकरच्या साथीने संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. विराट कोहलीही ७७ धावांवर मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पाऊसाचा व्यत्यय थांबल्यानंतर आमिरने त्याची विकेट घेतली.

यानंतर केदार जाधव आणि विजय शंकर जोडीने फटकेबाजी करत संघाला ३३६ धावांचा टप्पा गाठून दिला. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने ३ तर हसन अली आणि वहाब रियाझ यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.