फिरकीपटू नॅथन लायनचे ५ बळी आणि त्याला मिचेल स्टार्कच्या प्रभावी माऱ्याची मिळालेली साथ याच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा २७९ धावांनी पराभव केला. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव अवघ्या १३६ धावांत आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-० अशी जिंकली. दमदार कामगिरी करणाऱ्या मार्नस लाबूशेनला सामनावीर आणि मालिकावीर असा दुहेरी सन्मान मिळाला.

न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत निर्भेळ यश संपादन करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ

या धडाकेबाज कामगिरीसह ऑस्ट्रेलियाने आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठी झेप घेत आपलं दुसरं स्थान अधिक भक्कम केलं आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत या स्पर्धेअंतर्गत १० सामने खेळले असून यापैकी ७ सामन्यात कांगारुंनी विजय मिळवला आहे. कांगारुंचा एक सामना अनिर्णित राहिला असून दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात सध्या २९६ गुण जमा आहेत. टीम इंडिया या स्पर्धेत ७ सामन्यांत ७ विजयांसह ३६० गुणांनिशी अव्वल स्थानी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ अशाचप्रकारे खेळत राहिल्यास आगामी काळात टीम इंडियाचं अव्वल स्थान धोक्यात येऊ शकतं.

आयसीसी कसोटी अजिंक्यपद गुणतक्ता –

१) भारत – ७ सामने ७ विजय – ३६० गुण

२) ऑस्ट्रेलिया – १० सामने ७ विजय – २९६ गुण

३) पाकिस्तान – ४ सामने १ विजय – ८० गुण

४) श्रीलंका – ४ सामने १ विजय – ८० गुण

५) न्यूझीलंड – ५ सामने १ विजय – ६० गुण

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५४ धावांची मजल मारल्यानंतर लायनच्या फिरकीपुढे न्यूझीलंडचा पहिला डाव २५१ धावांवर गडगडला. लायनने ६८ धावांमध्ये पाच बळी मिळवले. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला २०३ धावांची मिळाली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावातही दमदार खेळी केली. वॉर्नरच्या शतकानंतर ऑस्ट्रेलियाने २ बाद २१७ धावांवर डाव घोषित केला.

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात अत्यंत खराब झाली. टॉम ब्लंडेल(२), टॉम लॅथम(१), जीत रावल(१२), फिलिप्स (०) आणि रॉस टेलर (२२) हे पाच फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ५ बाद ३८ झाली होती. त्यानंतर कॉलिन डी ग्रँडहोमने दमदार अर्धशतक लगावत काही काळ संघर्ष केला. पण तोदेखील ५२ धावांवर बाद झाला. न्यूझीलंडचे ९ गडी १३६ धावांत बाद झाले. तर एक गडी दुखापतीमुळे फलंदाजी करू शकला नाही.