महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीमध्ये, भारतीय निवड समितीने ऋषभ पंतला भारतीय संघात संधी दिली. मात्र विंडीज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पंतने फलंदाजीत पुरती निराशा केली. गेल्या काही सामन्यांमध्ये ऋषभ गलथान फटके खेळत स्वतःची विकेट फेकतो आहे. त्याच्या या खेळामुळे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड चांगलेच नाराज झाले होते. ऋषभ पंतवरुन भारतीय संघात असलेल्या अनिश्चीततेच्या वातावरणावरुन, रवी शास्त्री यांनी आपलं परखड मत मांडलं आहे.

अवश्य वाचा – रोहितवर दबाव नाही, त्याला वेळ दिला जाईल – रवी शास्त्री

संघ व्यवस्थापनात पंतवरुन अनेक मतमतांतर आहेत असा प्रश्न विचारला असता शास्त्री म्हणाले, “संघ व्यवस्थापनाला दोष देऊ नका, मी म्हणालो होतो जर आता पुन्हा पंत चुकीचा फटका खेळून बाद झाला तर मी त्याला फटके देईन. जर एखादा खेळाडू चूक करत असेल तर मी बोलणारच. मी काही संघात तबला वाजवायला आलो आहे का? पण पंतवर माझा विश्वास आहे. तो लवकरच त्याच्या जुन्या फॉर्मात परत येईल, आणि तोपर्यंत आम्ही त्याच्या पाठीशी आहोत.” हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शास्त्रींनी पंतबद्दल आपलं मत मांडलं.

यावेळी बोलत असताना रवी शास्त्रींनी ऋषभला पाठींबा दर्शवला. “ऋषभ मॅच-विनर खेळाडू आहे. सध्याच्या घडीला मर्यादीत षटकांमध्ये त्याच्या इतकी प्रतिभा असलेले पाच खेळाडूही मला सापडणार नाहीत. तो सध्याच्या अनुभवांमधूनही शिकेल. आम्ही त्याला अखेरपर्यंत संधी देणार आहोत.” त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत ऋषभ पंतला संधी मिळते का आणि मिळालेल्या संधीचं तो सोनं करतो का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA : पहिल्या कसोटीमधून ऋषभ पंतचा पत्ता कट? वृद्धीमान साहाला संधी