जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका बीसीसीसीआय सह बहुतांश क्रिकेट बोर्डांनाही बसला. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. त्यामुळे होणारं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आयसीसीने खेळाडूंना सराव करण्यासाठी नियमावली आखून दिली. काही देशातील खेळाडूंनी यानुसार सरावाला सुरुवातही केली आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावर टांगती तलवार आहे. ऑस्ट्रेलियात करोनाचा सामना करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यामुळे यानंतर मिळणाऱ्या अल्प कालावधीत विश्वचषकासारखी स्पर्धा आयोजित करणं हे धोक्याचं ठरु शकतं. म्हणूनच या स्पर्धेचं आयोजन पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे.

विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआय या जागेवर आयपीएल खेळवण्याच्या विचारात आहे. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह काही माजी खेळाडूंचा याला विरोध आहे. अशा परिस्थितीत विंडीजचे माजी दिग्गज खेळाडू मायकल होल्डिंग बीसीसीआयची पाठराखण करण्यासाठी धावून आले आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला आयपीएलचं आयोजन करण्याचा अधिकार असल्याचं होल्डिंग यांनी म्हटलं आहे. “आयपीएलचं आयोजन करता यावं म्हणून आयसीसी टी-२० विश्वचषकाबद्दलचा निर्णय लांबवत आहे असं मला वाटत नाही. ऑस्ट्रेलियन सरकारने केलेल्या नियमानुसार ३० सप्टेंबरपर्यंत कोणताही परदेशी व्यक्ती देशात प्रवेश करु शकणार नाहीये. त्यामुळे टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार नसेल तर बीसीसीआयला त्याजागेवर आयपीएलचं आयोजन करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे.” होल्डिंग यांनी आपलं मत मांडलं.

आयपीएलचा तेरावा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागणार आहे. यासाठीच बीसीसीआयने अद्याप पूर्णपणे स्पर्धा रद्द केलेली नाही. काही दिवसांपूर्वी खजिनदार अरुण धुमाळ यांनी बीसीसीआय देशाबाहेर स्पर्धेचं आयोजन करण्याच्या पर्यायावर विचार करत असल्याचं म्हटलं होतं. आतापर्यंत श्रीलंका आण UAE क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन आपल्या देशात करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय प्रवासाबद्दल अद्याप ठोस निर्णय न आल्यामुळे बीसीसीआयने अद्याप आयपीएलबद्दल निर्णय घेतलेला नाही. १० जूनला आयसीसीची बैठक पार पडणार आहे, या बैठकीत टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबद्दल काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.