अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय इसमाच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आहे. वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू ख्रिस गेल, डॅरेन सॅमी यांनीही या प्रकरणावर आपलं परखड मत मांडलं. केवळ फुटबॉलच नाही, तर क्रिकेटमध्येही खेळाडूंना वर्णद्वेषाचा सामना करावा लागतो, असं विधान ख्रिस गेलने केलं होतं. त्यानंतर, IPL मध्ये संघातील काही खेळाडू मला ‘काळू’ म्हणायचे, असं डॅरेन सॅमीने सांगितले होते. या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी खेळाडू फिल डीफ्रिटस याने त्याच्यासोबत घडलेला वर्णद्वेषाचा भयंकर अनुभव सांगितला.

“मी जेव्हा स्थानिक क्रिकेट खेळायचो, तेव्हा आमच्या संघात अनेक गौरवर्णीय खेळाडू होते. मला नेहमी त्यांच्याइतकंच महत्त्व मिळावं असं वाटायचं, पण त्या संघाने मला कधीच आपलंसं केलं नाही. प्रत्येक सामना खेळताना हा माझा शेवटचा सामना असू शकतो अशी भीती मला वाटत असायची, पण इंग्लंडच्या संघात खेळण्याची ओढ मला चांगली कामगिरी करण्यास भाग पाडायची. मला धमकीची पत्रदेखील आली. एकदा नव्हे, तर दोन-तीन वेळा मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ‘तू जर इंग्लंडच्या संघातून खेळलास, तर तुला गोळी घालू’, अशी धमकी लिहिलेली पत्र माझ्या घरात येऊन पडायची”, असे डीफ्रिटस म्हणाले.

फिल डीफ्रिटस आणि राशिद खान (फोटो सौजन्य – फिल डीफ्रिटस इन्स्टाग्राम) 

त्यावेळी मला पाठिंबा देणारं असं कोणीच नव्हतं. मला मदत करणारंही कोणी नव्हतं. मला त्या साऱ्या कठीण प्रसंगांना एकट्यालाच सामोरं जावं लागलं आणि त्याचंच मला सर्वात वाईट वाटलं. मी घरी जाऊन आईला सांगायचो की मला इथले कोणीच आपलंसं करत नाहीत, मी इथला आहे असं वाटतंच नाही. पण आता जेव्हा मी माझ्या कारकिर्दीकडे पाहतो, तेव्हा मी जे कमावलं त्याचा मला अभिमान वाटतो, असेही त्याने सांगितले.