भारतीय फुटबॉल महासंघाने इगॉर स्टिमॅक यांची भारतीय फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली आहे. आगामी २ वर्षांसाठी स्टिमॅक यांना करारबद्ध करण्यात आलेलं आहे. स्टिमॅक हे क्रोएशियन संघाचे प्रशिक्षक होते. आपल्या संघाला २०१४ च्या फिफा विश्वचषकासाठी पात्रता मिळवून देण्यात स्टिमॅक यशस्वी झाले होते.

भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्टिमॅक यांचं स्वागत करत, भारतीय संघासाठी स्टिमॅक हे योग्य प्रशिक्षक असल्याचं म्हटलंय. “भारतीय फुटबॉलमध्ये सध्या परिवर्तनाचा काळ आहे, अनेक नवीन बदल घडत आहेत. त्यामुळे स्टिमॅक यांचा अनुभव भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल.” पटेल प्रसारमाध्यांशी बोलत होते.

५ जूनपासून थायलंडमध्ये सुरु होणारा किंग्ज चषक ही स्टिमॅक यांच्यासमोरची पहिली परीक्षा असणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी क्युर्सो संघाविरुद्ध असणार आहे. स्टिमॅक स्टिफन कॉन्स्टनटाईन यांच्या जागेवर काम पाहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्टिमॅक यांनी आपल्या मुलाखतीदरम्यान, जर आपली निवड झाल्यास भारतीय संघात किंग्ज चषकासाठी कोणत्या खेळाडूंची निवड होईल याची सादर केली. यामुळेच फुटबॉल महासंघाने स्टिमॅक यांच्या पारड्यात आपलं दान टाकल्याचं म्हटलं जातंय.