राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांबाबत निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या पुरस्कारांच्या नियमावलीत सुधारणा केली आहे.
मंत्रालयाने केलेल्या सुधारणांनुसार अर्जुन पुरस्कार निवड समितीचे अध्यक्षपद सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाकडे दिले जाणार आहे. पॅरा क्रीडा प्रकारांतील खेळाडूंच्या निवड समितीत संबंधित खेळाच्या संघटकाचा किंवा क्रीडातज्ज्ञाचा समावेश केला जाणार आहे. हाच सदस्य अर्जुन पुरस्कार निवड समितीचाही सदस्य असेल. या समितीच्या कामकाजाचे चित्रीकरण केले जाणार आहे. निवड समितीत प्रत्येक क्रीडा प्रकाराचा एक प्रतिनिधी असेल. एखाद्या खेळाडूने किंवा प्रशिक्षकांनी या पुरस्कारासाठी अर्ज केला नसला तरीही जर या खेळाच्या राष्ट्रीय संघटनेला या खेळाडू किंवा प्रशिक्षकाची या पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
वैयक्तिक क्रीडा प्रकारात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या पदकांनुसार गुण दिले जातील, तर सांघिक खेळातील खेळाडूंना संघाच्या कामगिरीच्या आधारे गुण मिळतील.