दुसऱ्या दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅडलेड कसोटी सामन्यावर वर्चस्व निर्माण करणाऱ्या भारतीय संघाचं आव्हान तिसऱ्या दिवशी अवघ्या काही तासांत नाट्यमयरित्या संपुष्टात आलं. ८ गडी राखून भारतावर मात करत ऑस्ट्रेलियाने ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्यापुढे भारताचा दुसरा डाव अवघ्या ३६ धावांत संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने आपली निच्चांकी धावसंख्याही यादरम्यान नोंदवली. विजयासाठी मिळालेलं ९० धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सहज पूर्ण केलं. मॅथ्यू वेड आणि बर्न्स यांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी करत संघाच्या विजयाची पायाभरणी केली. जो बर्न्सने नाबाद ५१ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

दुसऱ्या डावातील भारतीय संघाच्या खराब कामगिरीवर सध्या बरीच चर्चा सुरु आहे. त्यातच कर्णधार विराट कोहली भारतात परतणार असल्यामुळे संघासमोरची चिंता आता अधिकच वाढणार आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगने भारताला दुसऱ्या कसोटीसाठी पंतला संघात संधी देण्याचा सल्ला दिला आहे. “पहिल्या कसोटीत भारताचा ज्या पद्धतीने पराभव झालाय आणि आता विराटही भारतात परतणार असल्यामुळे दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाला संघात बदल करावे लागतील. भारताच्या मधल्या फळीत ऋषभ पंतची गरज आहे. कोहली संघात नसताना भारताला आपली फलंदाजी अधिक मजबूत ठेवावी लागले, यासाठी पंत संघात असायला हवा”, रिकी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

अवश्य वाचा – दुसऱ्या कसोटीसाठी लोकेश राहुलला भारतीय संघात स्थान मिळायला हवं – मोहम्मद कैफ

यावेळी बोलत असताना रिकी पाँटींगने भारतीय संघासमोर योग्य संघनिवडीसोबतच दुसऱ्या कसोटीत आत्मिविश्वासाने मैदानात उतरण्याचं आव्हान असणार असल्याचं म्हटलंय. पहिल्या कसोटीत कांगारुंनी ज्या पद्धतीने विजय मिळवला आहे तो पाहता ते आता मागे वळून पाहणार नाहीत असंही पाँटींग म्हणाला. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे कसोटी मालिकात ४-० ने जिंकण्याची चांगली संधी असल्याचंही पाँटींगने सांगितलं. २६ डिसेंबरपासून दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे.