28 September 2020

News Flash

मॅटवरील कबड्डीमुळे दुखापतीत वाढ

मातीत होणारी कबड्डी अन् मॅटवर होणाऱ्या कबड्डीमध्ये मोठय़ा प्रमाणात फरक आहे.

बंगळुरू बुल्सचे प्रशिक्षक रणधीर सिंग यांचे मत

नव्या अवतारात आलेल्या प्रो-कबड्डीने अल्पकाळातच लोकप्रियतेचे शिखर गाठले असले तरी यामध्ये मातीतल्या कबड्डीची मजा नाही. शिवाय खेळाडूंना होणाऱ्या दुखापतीमध्ये वाढ झाली असून त्याचा खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम पडत असल्याचे मत बंगळुरू बुल्सचे प्रशिक्षक रणधीर सिंग यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

मातीत होणारी कबड्डी अन् मॅटवर होणाऱ्या कबड्डीमध्ये मोठय़ा प्रमाणात फरक आहे. मातीमधल्या कबड्डीतून एकप्रकारची ऊर्जा मिळत असे. तुमची पकड मजबूत करण्यास मदत होत होती. मात्र, मॅट ही कृत्रिम बनावटीची असल्याने त्यावरील कबड्डीत पकड कमी आहे, शिवाय मांडी आणि पायाच्या दुखापती मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, त्यावर आम्ही सलग आठ दिवस सराव करू शकत नाही. आज ग्लॅमरने भरपूर असलेल्या कबड्डीला मात्र मॅटशिवाय पर्याय नाही. सर्व देश मॅटचा वापर करत असल्याने नाईलाजाने मॅटवर खेळणे भाग पडले आहे. प्रो-कबड्डीचा फायदा सर्वसामान्य खेळाडूंना कसा करून दिला? यावर सिंग म्हणाले की, मी नेहमी नव्या दमाच्या खेळाडूंच्या शोधात असतो. दरवेळी नवे पर्व सुरू होण्याआधी मी अनेक गावात भेट देतो. तेथील कबड्डीचे सामने बघतो व मला ज्याची खेळी प्रभावित करते अशा कबड्डीपटूची मी प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करतो. त्यावर मेहनत घेऊन सज्ज करतो. आज अनेक खेळाडूंना मी थेट प्रो-कबड्डीसाठी निवडले असून ते उत्कृष्ट प्रदर्शन करताहेत. प्रो-कबड्डीत वाढलेल्या स्पध्रेत खेळाडू कसा टिकून राहील, यावर सिंग म्हणाले की, आपली प्रतिभा दाखवण्यासाठी खेळात स्पर्धा आवश्यक आहे. यंदाच्या पाचव्या पर्वात चार नवे संघ आल्याने स्पर्धा वाढली असल्याने नवोदित खेळाडूंना आपले नाव कमविण्याची ही सुवर्ण संधी मिळाली आहे. माझ्या संघातील खेळाडूंनाही मी नेहमी संर्घषाशिवाय काहीच प्राप्त होऊ शकत नाही, असे सांगत असतो.

नागपूरविषयी बोलताना सिंगने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, मला नागपूरने भरपूर काही दिले. मी पूर्वी रेल्वेत तिकीट तपास अधिकारी होतो. त्यामुळे नेहमी नागपूरला येत होतो. शिवाय अजनी मदानावर अनेक स्पध्रेत मी नागपूरचे प्रतिनिधित्व देखील केले आहे. मात्र, यंदा बंगळुरू बुल्सचा प्रशिक्षक म्हणून येण्याची संधी मिळाली. बंगळुरूला मदान उपलब्ध होत नसल्याने सामने दुसऱ्या शहरात हलवण्यासाठी चार पर्याय आमच्याजवळ होते. अशात मी नागपूर निवडण्याचा सल्ला दिला. नागपूरकरांनीही अल्पकाळात आम्हाला प्रचंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जरी आम्ही यंदाच्या मोसमात काही सामन्यात पराभव स्वीकारला असला तरी मी बंगळुरूला अंतिम फेरीत बघतो.

ऑलिम्पिकमध्ये कबड्डीचा समावेश व्हावा

प्रो-कबड्डीमुळे आज देशात कबड्डीला पोषक वातावरण आहे. नव्या दमाचे खेळाडू क्रिकेटनंतर कबड्डीच्या मदानात येताना दिसत आहेत. शालेय स्तरावरही कबड्डीपटूंची संख्या वाढली आहे. गावातली कबड्डी आता शहरात आली आहे. प्रो-कबड्डीने खेळाडूंसाठी मोठा मंच उपलब्ध करून दिले असून लाखो रुपयांत कबड्डीपटूंचा लिलाव होत आहे. मोठय़ा प्रमाणात कबड्डीपटूंना रोजगार मिळत आहे. शिवाय लोकांनीही प्रो-कबड्डीला उदंड प्रतिसाद दिला आहे. कबड्डी केवळ भारतातच नाही तर अनेक देशात खेळल्या जात असल्याने आता ऑलिम्पिकमध्येही कबड्डीचा समावेश व्हायला हवा, अशी इच्छा सिंग यांनी व्यक्त केली.

मला प्रो-कबड्डीने खरी ओळख दिली

मी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. खेळाडू व प्रशिक्षक म्हणून अनेक पुरस्कार मिळवले आहेत. आशियाई स्पध्रेत २० सुवर्णपदक माझ्या नावे आहेत. तसेच १९९७ मध्ये अर्जुन पुरस्कार देखील मिळाला आहे. असे असताना देखील मला मर्यादित लोक ओळखत होते. मात्र, जेव्हापासून प्रो-कबड्डीचा जन्म झाला तेव्हा मला खरी ओळख मिळाली. बंगळुरू बुल्सच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याने मी खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलो व माझ्या चाळीस वर्षांचा कबड्डीचा प्रवास जगासमोर आला, असेही सिंग यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 2:10 am

Web Title: increased injury due to mat kabaddi coach randhir singh
Next Stories
1 Pro Kabaddi Season 5 – गुजरातच्या जाळ्यात मुंबईची ससेहोलपट
2 तुम्ही देवापेक्षा मोठे नाही!, श्रीशांतने बीसीसीआयला सुनावलं
3 पांड्या भारताचा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू होऊ शकतो!
Just Now!
X