परदेशात आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाची खराब सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतू मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात पृथ्वी शॉला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला. पहिल्या सत्राअखेरीस भारताने २ गड्यांच्या मोबदल्यात ४१ धावांपर्यंत मजल मारली.

शुबमन गिलला डावलून संघात स्थान मिळालेल्या पृथ्वी शॉने निराशानक कामगिरी केली. मिचेल स्टार्कचं पहिलं षटक खेळताना खराब फुटवर्कमुळे बॉल पृथ्वी शॉच्या बॅटची कड घेऊन स्टम्पवर जाऊन आदळला. दुसऱ्याच चेंडूवर बसलेल्या या फटक्यामुळे भारतीय संघ बॅकफूटवर फेकला गेला. यानंतर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी खेळपट्टीवर स्थिरावत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

दोन्ही खेळाडूंनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी केली. परंतू या भागीदारीदरम्यान दोन्ही फलंदाज अत्यंत धीम्या गतीने खेळले. मैदानात पाय स्थिरावल्यानंतर मयांकने फटकेबाजी करत धावा जमावण्याचा प्रयत्न केला. परंतू पॅट कमिन्सच्या एका चेंडूवर अग्रवाल पूर्णपणे फसला. टप्पा पडून आता आलेला चेंडू थेट स्टम्पवर जाऊन आदळला, मयांकने १७ धावा केल्या. यानंतर कर्णधार विराट आणि पुजाराने अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेत पहिलं सत्र खेळून काढलं. त्यामुळे दुसऱ्या सत्रात भारतीय फलंदाज धावांचा ओघ वाढवतात का हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे.