कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली बॉक्सिंग डे कसोटी सामन्याची आश्वासक पद्धतीने सुरुवात केली आहे. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या ३ फलंदाजांना माघारी धाडण्यात भारताला यश आलं. पहिल्या सत्राअखेरीस कांगारुंचा संघ ६५ धावांपर्यंत मजल मारु शकला.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराहने तिसऱ्याच षटकात कांगारुंना धक्का देत सलामीवीर जो बर्न्सला माघारी धाडलं. यानंतर मॅथ्यू वेड आणि लाबुशेन यांनी छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. परंतू कांगारुंवर वर्चस्व मिळवण्यासाठी कर्णधार रहाणेने गोलंदाजीत बदल करत लगेच आश्विनला संधी दिली.

आश्विननेही आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत मॅथ्यू वेडला आपल्या जाळ्यात अडकवलं. वेड ३० धावा काढून बाद झाला. पाठोपाठ स्टिव्ह स्मिथही आश्विनच्या गोलंदाजीवर भोपळा न फोडता माघारी परतला. त्यामुळे सुरुवातीच्या सत्रातच तीन बिनीचे शिलेदार माघारी परतल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर गेला. अखेरीस ट्रॅविस हेड आणि लाबुशेन यांनी उरलेलं सत्र खेळून काढत संघाची अधिक पडझड रोखली.