भारतीय संघाचा जम्बो ऑस्ट्रेलिया दौरा अखेर शेवटच्या टप्प्यात आला आहे. टी २० आणि एकदिवसीय मालिका झाल्यानंतर आता कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना ब्रिस्बेनच्या गॅबावर खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात काही बदल दिसण्याची शक्यता आहे. भारताचे काही विश्वासपात्र खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. पण याच दरम्यान ऑस्ट्रेलियन संघाला मात्र एक धक्का बसला आहे.
पदार्पणातच अर्धशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्हस्की हा चौथ्या सामन्यातून बाहेर झाला आहे. तिसऱ्या सामन्यात पाचव्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना पुकोव्हस्की जमिनीवर पडला. त्याच्या शरीराचा भार त्याच्या हातावर आला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच दिवशी त्याला पुढील वैद्यकीय चाचणीसाठी व स्कॅनसाठी नेण्यात आले होते. त्याची दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्याने चौथ्या कसोटीतून माघार घेतली. पुकोव्हस्की सामन्यातून बाहेर गेला असून त्याच्या जागी मार्कस हॅरीसला संघात स्थान देण्यात आले आहे.
A big change for the Aussies ahead of the series decider #AUSvIND https://t.co/Kv1drj79nO
— cricket.com.au (@cricketcomau) January 14, 2021
आणखी वाचा- IND vs AUS: स्मिथच्या बचावासाठी प्रशिक्षक लँगर मैदानात, म्हणाले…
मार्कस हॅरिस हा वॉर्नरसोबत चौथ्या सामन्यात सलामीला येणार आहे. २०१८-२०१९ मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत २-१ असं कसोटी मालिकेत पराभूत केलं होते. या मालिकेत मार्कस हॅरिसला संधी देण्यात आली होती. चार सामन्यात आणि आठ डावांमध्ये त्याला दोन वेळा अर्धशतक झळकावता आलं होतं. इतर वेळी तो ३० धावांपेक्षा जास्त खेळू शकलेला नव्हता. त्यामुळे चौथ्या सामन्यात त्याच्या खेळाचा ऑस्ट्रेलियन संघाला किती फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.