ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद १७२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला. त्यास प्रत्युत्तर म्हणून कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांनी केलेल्या नाबाद भागीदारीच्या जोरावर भारताला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने २ तर हेजलवूडने १ बळी टिपला.

या सामन्यात भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली. उपहारापर्यंत भारताने ६ धावा करून मुरली विजयचा बळी गमवला. दुसऱ्या सत्रात राहुल २ धावा काढून त्रिफळाचित झाला. विराट कोहलीबरोबर अर्धशतकी भागीदारी करणारा पुजारा तिसऱ्या सत्राच्या सुरूवातीला २४ धावांवर झेलबाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. स्टार्कने त्याला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केले. पण कोहलीने मात्र एक बाजू लावून धरली. त्याने एका वर्षात आपले २०वे अर्धशतक पूर्ण केले आणि कोणत्याही भारतीय फलंदाजाला न जमलेला विक्रम नावावर केला.

विराटने चालू कॅलेंडर वर्षात १९ पेक्षा अधिक वेळा अर्धशतक ठोकली. त्याने चौथ्यांदा हा पराक्रम केला असून अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. आजच्या अर्धशतकी खेळीनंतर त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पाँटिंग व संगकारा यांनीही ४ वेळा एकाच वर्षांत १९ पेक्षा अधिक वेळा पन्नासहून अधिक धावा केल्या होत्या.

दरम्यान, कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी पुजारासह ७४ धावा जोडल्या. पुजारा बाद झाल्यानंतर कोहलीने रहाणेसोबत अर्धशतकी भागीदारी केली. विराट कोहली ८२ धावांवर तर रहाणे ५१ धावांवर खेळत आहे.