मेलबर्न कसोटीत भारताने यजमान ऑस्ट्रेलियावर १३७ धावांनी मात करत ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. भारताला अखेरच्या दिवशी विजयासाठी अवघ्या २ विकेटची गरज होती. मात्र दिवसाच्या सुरुवातीलाच पावसाने सामन्यात हजेरी लावल्यामुळे सर्व चाहत्यांच्या मनात धाकधूक निर्माण झाली होती. सुदैवाने पावसाचा खेळ थांबल्यानंतर, भारतीय गोलंदाजांनी कांगारुंच्या शेपटाला जास्त वळवळ करण्याची संधी न देता सामन्यात बाजी मारली. या कामगिरीनंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार ‘द वॉल’ राहुल द्रविडनेही भारतीय गोलंदाजांचं कौतुक केलं आहे.

“भारतीय गोलंदाज सध्या ज्या पद्धतीने खेळ करत आहेत ते पाहून खरंच खूप बरं वाटलं. आपले गोलंदाज प्रत्येक सामन्यात २० बळी घेत आहेत, आणि आता भारतीय गोलंदाज प्रत्येक सामन्यात २० बळी घेण्याची ताकद बाळगून आहेत. जेव्हा तुमचे गोलंदाज सर्वोत्तम कामगिरी करत असतात, तेव्हा तुमच्यासाठी तो एक महत्वाचा मुद्दा ठरतो. सध्या संघात खेळत असलेल्या महत्वाच्या गोलंदाजांव्यतिरीक्त आपल्या संघातील गोलंदाजांची राखीव फळीही तितकीच चांगली आहे.” राहुलने भारतीय गोलंदाजांची पाठ थोपटली.

अवश्य वाचा – Ind vs Aus : टीम इंडियाचा १५० वा कसोटी विजय, कांगारूंचा १३७ धावांनी पराभव

याचसोबत राहुलने चेतेश्वर पुजाराच्या फलंदाजीचंही कौतुक केलं. आतापर्यंत मालिकेत पुजाराचा फॉर्म चांगला आहे. इंग्लंडमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात वगळल्यानंतर ज्या पद्धतीने त्याने पुनरागमन केलंय ते पाहता पुजाराला खरंच दाद देणं गरजेचं आहे. चेन्नईत एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेत उपस्थितीदरम्यान राहुल द्रविड पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होतात. या मालिकेतला अखेरचा सामना ३ जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे.