यष्टीरक्षक मॅथ्यू वेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अखेरच्या टी-२० सामन्यात १८६ धावांचा डोंगर उभा केला आहे. भारतीय क्षेत्ररक्षकांनी तिसऱ्या टी-२० त अतिशय खराब कामगिरी करत सोपे झेल सोडले, ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाला मिळाला. वेड आणि मॅक्सवेल जोडीने भारतीय गोलंदाजांची धुलाई करत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. वेडने ८० तर मॅक्सवेलने ५४ धावांची खेळी केली.

प्रत्युत्तरादाखल मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. ग्लेन मॅक्सवेलच्या पहिल्याच षटकात लोकेश राहुल शून्यावर माघारी परतला. मॅक्सवेलला पहिलं षटक देण्याचा ऑस्ट्रेलियाचा जुगार फळाला आला. आखुड टप्प्याच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर असलेल्या स्मिथकडे झेल देऊन राहुल बाद झाला. तब्बल ४ वर्षांनी लोकेश राहुलवर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये शून्यावर बाद होण्याची वेळ आली आहे.

ग्लेन मॅक्सवेलने तिसऱ्या सामन्यात आश्वासक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. मॅथ्यू वेडच्या साथीने महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करताना मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. ३६ चेंडूत ३ चौकार आणि षटकारांसह मॅक्सवेलने ५४ धावा केल्या. अखेरच्या षटकांत नटराजनने त्याचा त्रिफळा उडवला.

अवश्य वाचा – सेम टू सेम ! बुमराह-नटराजन यांच्या कारकिर्दीची ही आकडेवारी पाहून तुम्हीही थक्क व्हाल