भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बुधवारपासून क्रिकेट मालिका सुरु होणार आहे. या दौऱ्यात ३ टी२० सामने, ४ कसोटी सामने आणि ३ एकदिवसीय सामन्याच्या मालिका रंगणार आहेत. या दौऱ्यासाठी ३-४ दिवसांपूर्वीच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. सामन्याआधी काही दिवस भारताच्या संघाला तेथील खेळपट्ट्या आणि तेथील वातावरणाशी जुळवून घेता यावे, म्हणून खेळाडूंनी मैदानावर सराव केलाच. पण यासह ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज जेसन गिलेस्पी याच्या मते आणखी एक कारण आहे ज्यामुळे भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नमवण्याची नामी संधी आहे.

भारत या दौऱ्यात ‘फेव्हरिट’ म्हणून खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या काही महिन्यात अत्यंत सुमार कामगिरी करत आहे. कारण या संघातील काही महत्वाचे खेळाडू संघात नाहीत. याऊलट भारताचा संघ उत्तम कामगिरी करत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी दिवसेंदिवस उत्तमोत्तम होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात सर्वोकृष्ट ११ खेळाडू कोण असतील हेदेखील आद्य कोणाला सांगता येत नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नमवण्याची भारताला नामी संधी आहे, असे गिलेस्पी म्हणाला.

मला माझ्या संघाच्याविरुद्ध काही बोलायचे नाही. पण सध्याच्या घडीला परिस्थिती पाहता भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नमवण्याची हीच सर्वोत्तम संधी आहे. त्यांच्याकडे सर्वोत्तम संघ आहे आणि त्याचा फायदा त्यांना होईल, असेही गिलेस्पीने सांगितले.