भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात भारत ४ धावांनी पराभूत झाला. पावसामुळे सामना १७ षटकांचा करण्यात आला होता. सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४ बाद १५८ धावा केल्या होत्या. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला १७ षटकात १७४ धावांचे आव्हान देण्यात आले. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. पण सर्वाधिक मार पडला तो कृणाल पांड्या याला…

कृणाल पांड्याच्या ४ षटकांमध्ये त्याने तब्बल १३.७५ धावांच्या सरासरीने ५५ धावा खर्च केल्या. ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टोयनीस या दोघांनी त्याच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. कृणालच्या ४ षटकात त्याला तब्ब्ल सहा षटकार लगावण्यात आले. त्यामुळे कृणालने गोलंदाजाला नको असलेला एक विक्रम आपल्या नावे केला. कृणाल हा टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा देणारा तिसरा गोलंदाज ठरला. या यादीत फिरकीपटू युझवेन्द्र चहल (६४) पहिल्या आणि जोगिंदर शर्मा (५७) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 

 

दरम्यान, भारताने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने सुरुवात काहीशी संथ केली. पण त्यानंतर फलंदाज आपल्या रंगात आले. डार्सी शॉर्ट ७ धावांवर स्वस्तात बाद झाला. पण कर्णधार फिंच आणि लीन यांनी तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली. फिंचने २४ चेंडूत २७ तर लीनने २० चेंडूत ३७ धावा फाटकावल्या. हे दोघे बाद झाल्यावर मॅक्सवेलने सामन्याचा ताबा घेतला आणि २३ चेंडूत ४६ धावा केल्या. स्टोयनीसने त्याला उत्तम साथ देत १९ चेंडूत ३३ धावा केल्या. भारताकडून कुलदीपने २ तर अहमद, बुमराने १-१ गडी बाद केला.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला केवळ १६९ धावाच करता आल्या. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा ७ धावांवर बाद झाला. पाठोपाठ राहुल १३ धावांवर माघारी गेला. लगेचच कोहलीही ४ धाव करून तंबूत परतला. पण शिखर धवनने एकाकी झुंज देत ७६ धावा केल्या. पण तो झेलबाद झाला. कार्तिकने १३ चेंडूत ३० धावा केल्या. पण त्याची झुंज अपयशी ठरली.