भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथी आणि अंतिम कसोटी सुरु आहे. या कसोटीत भारताने पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घोषित केला. चेतेश्वर पुजारा (१९३) आणि ऋषभ पंत ( नाबाद १५९) यांच्या दीडशतकी खेळीच्या बळावर भारताने ही डोंगराएवढी धावसंख्या उभारली. पुजाराने या मालिकेतील तिसरे शतक ठोकले. पण या मालिकेत फलंदाजीच्या शैलीवरून टीका होणाऱ्या ऋषभ पंतलादेखील सूर गवसला. ऋषभ पंतने दीडशतकी खेळी करत एक विक्रम प्रस्थापित केला.

पंतने नाबाद १५९ धावा लगावल्या. १८९ चेंडूत केलेल्या या खेळीत त्याने १५ चौकार आणि १ षटकार खेचला. या खेळीसह पाहुण्या संघाच्या यष्टीरक्षकाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अशा दोनही देशात शतक झळकावणारा ऋषभ दुसरा फलंदाज ठरला. या आधी विंडीजचा यष्टीरक्षक जेफरी डुजॉन याने १९८४ साली आधी मँचेस्टर मध्ये आणि त्याच वर्षी पर्थमध्ये शतक झळकावले होते.

 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर आपले पहिले शतक ठोकत असा पराक्रम करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक होण्याचा मान मिळवला. ऋषभने १३८ चेंडूत शतक झळकावले. या खेळीत त्याने ९ चौकार लगावले. यासह पंत ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला.