विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरमध्ये सुरूवात होणार आहे. या दौऱ्यासाठी खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. पण या खेळाडूंसोबत रोहित शर्मा मात्र ऑस्ट्रेलियाला रवाना झाला नाही. थेट कसोटी मालिका सुरू होण्याआधी रोहित ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र रोहितच्या तंदुरूस्तीबाबत नीट माहिती मिळत नसल्याने माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याआधी, लोकेश राहुलला कसोटी संघात स्थान मिळाल्यावरूनही संजय मांजरेकर यांनी संताप व्यक्त केला होता.

सध्या रोहित आपल्या कुटुंबासमवेत युएईमध्ये आहे. तेथून तो पुन्हा भारतात दाखल होणार आहे. येथे तो आपल्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरूस्त होण्यासाठी विश्रांती घेणार आहे. बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तो काही काळ सराव करणास असून फिटनेस चाचणी पार केल्यावर तो कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला रवाना होऊन संघात दाखल होणार आहे, अशी माहिती आहे. याच मुद्द्यावरून संजय मांजरेकर यांनी BCCI ला धारेवर धरलं.

रोहितची दुखापत कोणत्या स्वरूपाची होती आणि रोहित आता कितपत तंदुरूस्त आहे याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता नाही. रोहित आणि BCCI यांच्यात सर्व बाबींबद्दल चर्चा होत असणार यात शंकाच नाही. पण जेव्हा चाहत्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही, तेव्हा चर्चांना मात्र उधाण येतं. माझीदेखील तीच अवस्था आहे. नक्की रोहित आणि BCCI यांच्यात काय सुरू आहे हे समजतच नाहीये”, असं मत संजय मांजरेकर यांनी पाकिस्तानी यु-ट्यूब चॅनेल क्रिककास्टला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं.

“जेव्हा ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाशी मालिका खेळायची असते, तेव्हा प्रत्येक खेळाडूची तंदुरूस्ती महत्त्वाची असते. त्यामुळे रोहितच्या तंदुरूस्तीबद्दल अधिकृत माहिती कळायला हवी”, असेही ते म्हणाले. याआधी, लोकेश राहुलला कसोटी संघात स्थान मिळाल्यावरूनही संजय मांजरेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.