भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापेक्षा रोहित शर्माच्या दुखापतीच सध्या जास्त चर्चा सुरु आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना विराट कोहलीनंही रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल मौन सोडलं सोडलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये रोहित शर्मा का खेळू शकला नाही, याबाबत मीसुद्धा अनभिज्ञ आहे. परंतु रोहितच्या दुखापतीच्या स्थितीबाबत स्पष्टतेचा अभाव आणि गोंधळच अधिक होता, असे ताशेरे विराटने ओढले. विराट कोहलीच्या या वक्तव्यनंतर बीसीसीआयनं रोहित शर्माबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

रोहित शर्माची फिटनेस चाचणी ११ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर तो कसोटी मालिकेसाठीरवाना होणार की नाही याबाबत स्पष्ट होईल. बीसीसीआयनं जारी केलेल्या प्रसिद्धपत्रकात म्हटलं की, मांडीला झालेल्या दुखापतीवर उपचार घेतल्यानंतर रोहित शर्मा सध्या बेंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करीत आहे. ११ डिसेंबर रोजी त्याची फिटनेस चाचणी होणार आहे. रोहित शर्माच्या वडिलांना करोनाची लागन झाली होती. त्यामुळेच आयपीएलनंतर रोहित शर्मा मुंबईला रवाना झाला होता. त्यामुळे तो भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाला जाऊ शकला नाही. वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रोहित शर्मा एनसीएमध्ये सराव करत आहे.

विराट काय म्हणाला होता?
नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वार्धात ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी झालेल्या राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीआधीच रोहितने आपल्या अनुपलब्धतेबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवले होते. ‘आयपीएल’मधील दुखापतीनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी खेळणार नसल्याचे रोहितने ई-मेलद्वारे स्पष्ट केले होते, अशी माहिती विराटने पत्रकार परिषदेत दिली. मांडीला झालेल्या दुखापतीवर उपचार घेतल्यानंतर रोहित सध्या बेंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करीत आहे. ‘‘रोहित ‘आयपीएल’मध्ये खेळल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही निघेल अशी अपेक्षा होती, परंतु तो नसल्याबाबत पुरेशी स्पष्टता नाही,’’ असे विराटने म्हटले आहे.