IPL चा हंगाम संपल्यानंतर आता साऱ्यांना भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेचे वेध लागले आहेत. टीम इंडिया काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली असून नियमांनुसार क्वारंटाईनमध्ये आहे. टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा २७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्याची सुरूवात वन-डे आणि टी २० मालिकेने होणार आहे. तर सांगता कसोटी मालिकेने होणार आहे. या क्रिकेट मालिकेच्या आधीच यजमान ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजाने मालिकेतून माघार घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन याने वन डे आणि टी२० मालिकेतून माघार घेतली आहे. रिचर्डसन दांपत्याला नुकतीच पुत्रप्राप्ती झाली. त्यामुळे आपल्या बाळासोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी केन रिचर्डसनने पहिल्या दोन मालिकांमधून माघार घेतली आहे. केन रिचर्डसनच्या जागी संघात वेगवान गोलंदाज अँड्र्यू टाय याला संधी देण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी ही माहिती दिली. ऑस्ट्रेलियाने IPL आधी इंग्लंडमध्ये निर्धारित षटकांची मालिका खेळली. या मालिकेत टायचा संघात समावेश होता.

“केन रिचर्डसनसाठी माघार घेण्याचा निर्णय खूप कठीण होता. निवड समिती आणि सर्व खेळाडूंनी त्याच्या या निर्णयाचा आदरपूर्वक स्वीकार केला आहे. केनला पत्नी नायकी आणि बाळासोबत अॅडलेडमध्येच राहायचे आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्ड नेहमीच खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. खासकरून सध्याच्या करोनाच्या वातावरणात प्रत्येकाच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या मंडळ समजून घेत आहे”, असे मुख्य निवडकर्ते ट्रेव्हर होन्स यांनी स्पष्ट केले.