india tour of australia 2020 : विराट कोहलीनं अखेरच्या तीन कसोटी सामन्यातून माघार घेतली असली तरी ऑस्ट्रेलिया संघासमोर चिंता कमी झाल्याचं दिसत नाही. कारण, विराट कोहलीपेक्षाही ऑस्ट्रेलिया संघाला चेतेश्वर पुजाराची विकेट महत्वाची वाटते. ऑस्ट्रेलियाचा युवा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडनं दैनिक जागरणशी बोलताना म्हटले की, विराट कोहलीपेक्षा पुजाराची विकेट आमच्यासाठी महत्वाची आहे. २०१८-१९ च्या दौऱ्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियातील भारताचा हा पहिला कसोटी मालिक विजय होता. पुजाराने या मालिकेत चार कसोटी सामन्यात ७४.४२ च्या सरासरीनं ५२१ धावांचा पाऊस पाडला होता. यामध्ये तीन शतकांचा समावेश होता. अखेरच्या कसोटीतील नाबाद १९३ धावांची खेळी सर्वोत्तम खेळी होती.

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा गोलंदाजाला विचारलं की पुजारा आणि रहाणेसारख्या फलंदाजाच्या विरोधात कोणती रणनिती तयार केली आहे. यावर बोलताना हेजलवुड म्हणाला की,’गेल्या दौऱ्यात पुजारानं संयमी फलंदाजी करत गोलंदाजांना थकवलं होतं. पहिल्या चेंडूपासून पुजारा संयमी खेळत पहिल्यांदा गोलंदाजांना थकवतो, त्यानंतर तो वेगानं धावा काढतो. पुजाराची विकेट आमच्यासाठी महत्वाची असून आम्ही त्याला बाद करण्यासाठी तयार आहोत.’

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात २७ नोव्हेंबरपासून होणार आहे. सोनी टेन ३ या चॅनलवर भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामने पाहाता येणार आहेत. १७ डिसेंबर रोजी भारत पहिल्यांदाच विदेशात डे-नाइट सामना खेळणार आहे. भारतीय संघापेक्षा ऑस्ट्रेलियाला डे-नाइट कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. अशा परिस्थितीत पहिला कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघाला दबावात टाकण्याचा प्रयत्न करणार असल्याचं हेजलवुड म्हणाला.

बुमराह एक्स फॅक्टर :
हेजलवुडने विराट कोहलीशिवाय फलंदाजीत शुभमन गिल, हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्याविरोधात गोलंदाजी करणं आव्हानात्मक असल्याचं म्हटलेय. त्यासोबत भारताची गोलंदाजी आधिक धारधार होत असल्याचेही तो म्हणाला. बुमराह भारतीय संघात आल्यापासून भारतीय गोलंदाजी मजबूत झाली आहे. बुमराहजवळ विविधता आणि गती आहे. या दौऱ्यात भारतासाठी तो एक्स फॅक्टर ठरु शकतो, असं हेजलवुड म्हणाला.