ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने पहिला डाव ६२२ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमानांनी बिनबाद २४ धाव केल्या. पण अजूनही ऑस्ट्रेलिया ५९८ धावांनी पिछाडीवर आहे. सामन्यात भारताच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. चेतेश्वर पुजारा (१९३) आणि ऋषभ पंत (१५९*) यांनी दीडशतके ठोकली. तर नवोदित मयंक अग्रवाल (७७) आणि रवींद्र जाडेजा (८१) यांनी अर्धशतकी खेळी केली.

जाडेजा बाद झाल्यावर भारताने डाव घोषित केला. त्यावेळी ऋषभ पंत १५९ धावांवर नाबाद होता. भारताने डाव घोषित केल्यानंतर नवा विक्रम प्रस्थपित झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन वेळा एखाद्या कसोटी मालिकेत सलग तीन डाव घोषित करणारा भारत हा एकमेव संघ ठरला. सध्या सुरु असलेल्या मालिकेत भारताने तिसऱ्या कसोटीतील पहिला डाव ७ बाद ४४३ धावांवर घोषित केला होता. तर दुसरा डाव ८ बाद १०६ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर चौथ्या कसोटीत दुसऱ्या दिवशी भारताने पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घोषित केला. या आधी भारताने हाच पराक्रम २००८ साली केला होता. मोहाली आणि दिल्ली या ठिकाणी ही कामगिरी भारतने केली होती.

 

दरम्यान, भारताने ऑस्ट्रेलियात ७१ वर्षात एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. या चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने आघाडीवर आहे. सध्या सुरु असलेल्या चौथ्या सामान्यतही भारताने पहिल्याच डावात ६२२ धावांचा डोंगर उभारला आहे. सिडनीच्या मैदानावर ६००हून अधिक धावा करण्याची ही भारताची तिसरी वेळ ठरली. या पराक्रमामुळे भारताने इंग्लंड आणि विंडीज यांना मागे सोडले. सिडनीच्या मैदानावर इंग्लंडने २ वेळा ६०० हून अधिक धावा केल्या होत्या, तर विंडीजने ही कामगिरी एकदा केली आहे.