India tour of australia 2020 : विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. आठ महिन्यानंतर विराटसेना मैदानात उतरली आहे. दीड महिन्याच्या प्रदिर्घ दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन एकदिवसीय सामने, तीन टी-२० सामने आणि चार कसोटी सामन्याच्या मालिका होणार आहे. करोना महामारीमुळे हा दौरा बायो बबल सुरक्षेअंतर्गत होणार आहे. दोन आठवड्यांपासून ऑस्ट्रेलियात असणाऱ्या भारतीय संघाला तेथील परिस्थितीला जुळवून घेण्यास सज्ज झाला आहे. उद्यापासून सुरु होणारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान ही १३ वी द्विपक्षीय एकदिवसीय मालिका आहे. भारत जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरेल तर ऑस्ट्रेलिया गेल्या दौऱ्यातील पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल… दोन्ही संघाच्या आतापर्यंत झालेल्या कामगिरीवर एक नजर मारुयात… इतिहास नेमकं काय सांगतो पाहूयात….

कोणी-किती मालिका जिंकल्या ?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतपर्यंत १२ एकदिवसीय मालिका झाला आहेत. यामध्ये दोन्ही संघानं आतापर्यंत प्रत्येकी ६-६ मालिका जिंकल्या आहेत. दोन्ही संघात आतापर्यंत १४० एकदिवसीय सामने झाले आहेत. यामध्ये भारतीय संघानं ५२ सामन्यात बाजी मारली आहे. तर ७८ वेळा ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला आहे. १० सामन्याचा निकाल लागला नाही. भारतीय संघाची ऑस्ट्रेलियातील कामगिरी निराशजनक आहे. येथे झालेल्या ५१ एकदिवसीय सामन्यापैकी भारताला फक्त १३ सामन्यात विजय मिळवता आला आहे तर ३६ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. दोन सामन्याचा निकाल लागला आहे.

सर्वाधिक धावा चोपणारा भारतीय फलंदाज-
ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक एकदिवसीय धावा असणाऱ्या फलंदजामध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरनं ७१ सामन्यात ९ शतकं आणि १५ अर्धशतकांच्या मदतीनं ३०७७ धावांचा पाऊस पाडला आहे. दुसऱ्या क्रमांकावर हिटमॅन रोहित शर्मा असून रोहितनं ४० सामन्यात ८ शतक आणि ८ अर्धशतकांच्या साह्यानं २२०८ धावांचा पाऊस पाडला आहे. पण रोहित सध्या भारतीय संघात नाही. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या विराट कोहलीनं आछ शतकं आणि आठ अर्धशतकांच्या मदतीनं १९१० धावा चोपल्या आहे.

सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज –
ऑस्ट्रेलियाविरोधात एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजामध्ये माजी अष्टपैलू खेळाडू कपिल देव पहिल्या क्रमांकावर आहेत. कपिल देव यांनी ४१ सामन्यात ४५ विकेट घेतल्या आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आगरकरनं २१ सामन्यात ३६ बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक बळी घेणाऱ्या पहिल्या पाच भारतीय गोंलदाजांमध्ये सध्याच्या संघातील एकही खेळाडू नाही.