भारतीय संघ क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन या संघाविरुद्ध सराव सामना खेळत आहे. या सामन्यात क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघाने तिसऱ्या दिवसाअखेर ६ बाद ३५६ धावांपर्यंत मजल मारली असून ते दोन धावांनी पिछाडीवर आहेत. या सामन्यात पाच फलंदाजांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताचा पहिला डाव सर्वबाद ३५८ धावांवर संपुष्टात आला.

वरुणराजाने हजेरी लावत सामन्याचा पहिल्या दिवसा खेळ वाया घालवला. दुसऱ्या दिवशी भारताकडून नवोदित पृथ्वी शॉ याने ६६, चेतेश्वर पुजाराने ५४, कोहलीने ६४, अजिंक्य रहाणेने ५८ आणि हनुमा विहारीने ५३ यांनी अर्धशतके झळकावली. अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ व्यतिरिक्त मुंबईकर रोहित शर्माने ४० धावांची खेळी केली. या सामन्यात पृथ्वी शॉ विचित्र पद्धतीने बाद झाला. स्वीप फटका मारताना शॉचा पाय घसरला आणि तो त्रिफळाचीत झाला.

दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघाकडून डार्सी शॉर्टने ७४ तर ब्रँटने ६२ धावा केल्या. कार्डर (३८) आणि व्हाईटमेन (३५) यांना चांगली सुरुवात मिळाली पण हे दोघे त्यानंतर बाद झाले. आता नेल्सन आणि हार्डी हे दोघे खेळपट्टीवर नाबाद आहेत. नेल्सन ५६ तर हार्डी ६९ धावांवर खेळत आहे.