ऑस्ट्रेलियाच्या भूमीत भारतीय संघ ६ डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाची सलामीची जोडी कोण असेल? यावर अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत. याबाबत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी पृथ्वी शॉ आणि मुरली विजय ही सलामीची जोडी भारताने मैदानात उतरवावी असे मत व्यक्त केले. पहिल्या सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडू कोण असतील, हे सामन्याच्या दिवशीच स्पष्ट होईल. परंतु सराव सत्रामध्ये भारतीय संघातील एक उदयोन्मुख खेळाडू रोहितचे अनुकरण करण्याचे प्रयत्न करताना दिसला.

भारताचा फलंदाज रोहित शर्मा याचे चाहते अगणित आहेत. त्याच्यासारखी फलंदाजी आणि त्याच्यासारखे चेंडू टोलवणे हे आपल्यालाही जमायला हवे अनेक युवा फलंदाजाला वाटते. भारताचा नवोदित खेळाडू पृथ्वी शॉ हा देखील यास अपवाद नाही. पृथ्वी शॉ याने त्याचा सराव सत्रातील एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये तो डोळे मोठे करून काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करत आहे. त्याखाली त्याने कॅप्शन लिहिले आहे की ज्या पद्धतीने रोहित शर्मा फलंदाजी करताना त्याला चेंडू मोठा दिसतो, तसा चेंडू पाहण्याचा मी प्रयत्न करत आहे.

रोहित शर्माने अनेकदा शतके आणि द्विशतके ठोकली आहेत. या वेळी रोहित शर्माला चेंडू इतर फलंदाजांपेक्षा मोठा दिसत असल्याने तो उत्तम फटकेबाजी करत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्याचा सन्दर्भ येथे जोडत पृथ्वीने हे मजेशीर ट्विट केले आहे.