भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली. बांगलादेश संघाचा कर्णधार मोमिनुल याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण पहिल्या सत्रात हा निर्णय त्यांच्या विरोधात गेल्याचे काही अंशी दिसून आले. दुसऱ्या सत्रात बांगलादेशकडून चांगली झुंज पहायला मिळाली. कर्णधार मोमिनुल हक आणि अनुभवी मुश्फिकूर रहीम या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदीरी केली. अखेर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने ही जोडी फोडली.

रविचंद्रन अश्विनने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत कर्णधार मोमिनुलला त्रिफळाचीत केले. अश्विनने टाकलेला चेंडू कोणत्या दिशेने वळेल याचा काहीही अंदाज नसल्याने मोमिनुलने चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला पण चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा करून मोमिनुल बाद झाला.

IND vs BAN : टीम इंडियाचा ‘हिटमॅन’… नाबाद ३५०!

मोमिनुलला बाद करत अश्विनने भारतात आपले २५० कसोटी बळी टिपले. मोमिनुल हा त्याचा २५० वा बळी ठरला. मायदेशात २५० बळींचा टप्पा गाठणारा अश्विन भारतातील तिसरा आणि जगातील  १० वा गोलंदाज ठरला आहे. ४२ व्या कसोटी सामन्यात त्याने हा पराक्रम केला. या आधी भारताच्या अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग या दोघांनी हा पराक्रम केला आहे.

अश्विनने या पराक्रमसह संयुक्त विश्वविक्रम नोंदवला. आतापर्यंत ६ फिरकीपटू आणि ४ वेगवान गोलंदाजांनी मायदेशात २५० बळींचा टप्पा गाठला आहे. त्यात मायदेशात  सर्वात जलद ४२ कसोटी सामन्यांत २५० बळींचा टप्पा गाठणारा मुथय्या मुरलीधरन एकटा गोलंदाज होता. त्या विक्रमाशी बरोबरी करत अश्विनने संयुक्त विश्वविक्रम नोंदवला.