भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात इंग्लंडने चौथ्या दिवशी चहापानापर्यंत ५ बाद ११९ धावा केल्या. दुसऱ्या डावात जरी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजीवर अंकुश लावला असला तरी पहिल्या डावातील मोठ्या आघाडीमुळे इंग्लंडने एकूण आघाडी ३५० पार नेली. दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर बर्न्स शून्यावर बाद झाला. त्यानंतर डॉम सिबली (१६), डॅन लॉरेन्स (१८), बेन स्टोक्स (७) आणि जो रूट (४०) सारे जण फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाले.

आणखी वाचा- IND vs ENG: वॉशिंग्टन ‘अतिसुंदर’; दमदार फलंदाजी करत केला ‘हा’ पराक्रम

तत्पूर्वी जो रूटच्या द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ५७८ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांचे प्रयत्न मात्र फारच तोकडे पडले. रोहित शर्मा (६), शुबमन गिल (२९), विराट कोहली (११) आणि अजिंक्य रहाणे (१) हे चार वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले. चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी भारताचा डाव सावरला. पुजाराने ७३ तर पंतने ९१ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनेही एकाकी झुंज देत नाबाद ८५ धावा केल्या.

आणखी वाचा- IND vs ENG: तब्बल २० वर्षांनी ‘टीम इंडिया’बाबत घडला ‘हा’ दुर्दैवी योगायोग

दुर्दैवी योगायोग… पहिल्या डावात भारताचे दहाच्या दहा खेळाडू झेलबाद झाले. घरच्या मैदानावर एकाच डावात सगळे भारतीय फलंदाज झेलबाद होण्याची नामुष्की टीम इंडियावर तब्बल २० वर्षांनी ओढवली. या आधी मुंबईत ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय फलंदाजांबाबत हा प्रकार घडला होता.