चेन्नई येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघानं पहिल्या डावातील मोठ्या आघाडीच्या बळावर भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांचं आव्हान दिलं आहे. पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी असतानाही इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावांत भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा करत इंग्लंड संघाला १७८ धावांवर रोखलं. दोन्ही डावांत इंग्लंड संघाकडे ४१९ धावांची आघाडी आहे. भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांची आवशकता आहे. दुसऱ्या डावात फिरकीपटू आर. अश्विन यानं सर्वाधिक ६ बळी घेतले. नदीमला दोन तर बुमराह आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

चौथ्या दिवशी भारतीय संघाला ३३७ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंड संघानं २४१ धावांची आघाडी घेतली. इंग्लंड संघानं पहिल्या डावांत ५७८ धावांचा डोंगर उभा केला होता. दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर बर्न्स शून्यावर बाद झाला. त्यानंतर डॉम सिबली (१६), डॅन लॉरेन्स (१८), बेन स्टोक्स (७) आणि जो रूट (४०) एकापाठोपाठ एक जण फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाले. रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या फलंदाजीवर भारतीय संघाच्या विजयाची मदार आहे. दिग्गज फलंदाजाच्या साथीला शुबमन गिल, पंत आणि सुंदर यासारखे नवखे फलंदाजही आहेत.

तत्पूर्वी जो रूटच्या द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात ५७८ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांचे प्रयत्न मात्र फारच तोकडे पडले. रोहित शर्मा (६), शुबमन गिल (२९), विराट कोहली (११) आणि अजिंक्य रहाणे (१) हे चार वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले. चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी भारताचा डाव सावरला. पुजाराने ७३ तर पंतने ९१ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरनेही एकाकी झुंज देत नाबाद ८५ धावा केल्या.

अश्वीनने पहिल्याच चेंडूवर मोडला अनेक दशकांपूर्वीचा विक्रम
हिल्या डावात २४१ धावांनी भारतीय संघा पिछाडीवर असताना इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर अश्विन यानं इंग्लंडला धक्का दिला. अश्विन यानं पहिल्याच चेंडूवर सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्स याला अजिंक्य रहाणेकरवी झेलबाद केलं. दुसऱ्या डावात पहिल्याच चेंडूवर बळी घेत ११४ वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला.कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मागील ११४ वर्षांत डावाच्या पहिल्याच चेंडूवर एकाही फिरकी गोलंदाजाला बळी घेता आला नव्हता. पण चेन्नई कसोटी अश्विन यानं पहिल्या चेंडूवर बळी घेत विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी १८८८मध्ये इंग्लंडच्या बॉबी पील यांनी ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक बेन्नेर्मनला बाद करून प्रथम हा पराक्रम केला होता. त्यानंतर १९०७मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अल्बर्ट व्होग्लर यानी इंग्लंडच्या टॉम हेयबर्ड यांना बाद केले. त्यानंतर तब्बल ११४ वर्षानंतर अश्विननं हा मान पटकावला.

इशांतची ऐतिहासिक कामगिरी, ३०० बळींचा टप्पा केला पार
दुसऱ्या डावांत गोलंदाजी करताना इशांत शर्मानं लॉरेन्सला बाद करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इंग्लंडविरोधातील मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी इशांतच्या नावावर ९७ कसोटी सामन्यात २९७ बळींची नोंद होती. चेन्नई कसोटी सामन्यातील पिहल्या डावात इशांत शर्मानं दोन बळी घेतले. तर दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला विकेट मिळवत ३०० बळींचा पल्ला पार केला आहे. इशांत शर्मानं ९८ व्या कसोटी सामन्यात ३०० बळी घेतेले आहेत. इशांत शर्माआधी कपिल देव आणि झहीर खान या दिग्गजांनी कसोटी सामन्यात ३०० बळी घेतले आहेत. ३०० पेक्षा जास्त विकेट घेणारा इशांत शर्मा सहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

२० वर्षांनी ‘टीम इंडिया’बाबत घडला ‘हा’ दुर्दैवी योगायोग
चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात भारताचे दहाच्या दहा खेळाडू झेलबाद झाले. घरच्या मैदानावर एकाच डावात सगळे भारतीय फलंदाज झेलबाद होण्याची नामुष्की टीम इंडियावर तब्बल २० वर्षांनी ओढवली. या आधी मुंबईत ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय फलंदाजांबाबत हा प्रकार घडला होता.