टी-२० मालिकेत ५-० ने बाजी मारल्यानंतर भारतीय संघाने वन-डे मालिकेची सुरुवातही धडाकेबाज पद्धतीने केली. मुंबईकर श्रेयस अय्यरने केलेल्या शतकी खेळाच्या जोरावर भारताने हॅमिल्टन वन-डे सामन्यात ३४७ धावांपर्यंत मजल मारली. श्रेयस अय्यरने सर्वात आधी विराट कोहली आणि त्यानंतर लोकेश राहुलच्या साथीने भागीदारी रचत भारताला मोठी धावसंख्या उभारुन दिली. श्रेयस अय्यरने १०३ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

अय्यरच्या या शतकाने तब्बल ३२ वर्षांनी न्यूझीलंडच्या भूमीवर भारतीय फलंदाजाने अनोख्या विक्रमाची नोंद केली. १९८८ साली मोहिंदर अमरनाथ यांनी न्यूझीलंडविरुद्ध १०२ धावांची खेळी केली….त्यानंतर श्रेयस अय्यरने १०३ धावांची खेळी केली. काही महिन्यांपूर्वी चौथ्या क्रमांकावर कोणी फलंदाजी करायची हा प्रश्न भारतीय संघाला सतावत होता. मात्र श्रेयस अय्यरच्या या कामगिरीमुळे भारताचा हा प्रश्न आता संपला आहे असं दिसून येतंय.

दरम्यान, रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या अनुपस्थितीत भारताकडून मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ही जोडी सलामीला मैदानात उतरली. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्येही अर्धशतकी भागीदारी झाली. मात्र भारतीय सलामीवीरांना झटपट माघारी धाडण्यात न्यूझीलंडचे गोलंदाज यशस्वी ठरले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी केली. विराट कोहली इश सोधीच्या गोलंदाजीवर ५१ धावा काढून माघारी परतला.