कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर लोकेश राहुलच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारताने अखेरच्या टी-२० सामन्यात १६३ धावांपर्यंत मजल मारली आहे. विराट कोहलीला विश्रांती देत भारतीय संघ व्यवस्थापनाने रोहितकडे संघाचं नेतृत्व सोपवलं. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र डावाची सुरुवात चांगली झाली नाही. युवा फलंदाज संजू सॅमसनने अखेरच्या सामन्यातही निराशा केला. केवळ २ धावा काढून कुगलेजनच्या गोलंदाजीवर सॅमसन माघारी परतला, मात्र यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली.

रोहित शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेताना ६० धावांची खेळी केली. मात्र पोटरीचे स्नायू दुखावल्यामुळे त्याला उपचारांसाठी मैदान सोडावं लागलं. मात्र या अर्धशतकी खेळीदरम्यान रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १४ हजार धावांचा टप्पा पूर्ण करत दिग्गज भारतीय खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळवलं.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधलं रोहित शर्माचं हे २५ वं अर्धशतक ठरलं. यादरम्यान रोहितने आपला कर्णधार विराट कोहलीला मागे टाकलं.

याचसोबत न्यूझीलंडविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित पहिल्या स्थानी पोहचला आहे.

रोहितने आपल्या अर्धशतकी खेळीत ३ चौकार आणि ३ षटकार लगावले. दरम्यान दुसऱ्या बाजूने लोकेश राहुलनेही रोहितला चांगली साथ दिली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत राहुलने ३३ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावा केल्या. दरम्यान टी-२० मालिकेनंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध ३ वन-डे आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.