सलग 3 सामने जिंकून न्यूझीलंड दौऱ्याची मोठ्या झोकात सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाला चौथ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. 8 गडी राखून न्यूझीलंडने सामन्यात बाजी मारली. भारतीय संघाने दिलेलं 93 धावांचं आव्हान न्यूझीलंडने दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भुवनेश्वर कुमारने दुसऱ्या डावात भारताकडून 2 बळी घेतले. सामना संपल्यानंतर, हा पराभव आमच्यासाठी डोळे उडणारा असल्याची प्रतिक्रीया भुवनेश्वर कुमारने व्यक्त केली आहे.

“गेले काही महिने आम्ही सतत क्रिकेट खेळतो आहे. आमची कामगिरीही चांगली झाली आहे, त्यामुळे काही कालावधीनंतर असे सामने होणं गरजेचं असतं. यामधून आम्ही स्वतःला सुधारु शकतो. मालिका जिंकल्यानंतर आम्ही जरा निर्धास्त होतो, मात्र या सामन्यातही एकही गोष्ट आमच्या बाजूने घडली नाही. यामध्ये मला न्यूझीलंडच्या गोलंदाजांचं श्रेय कमी करायचं नाहीये, त्यांनी आज खरचं चांगला मारा केला. बोल्टचे काही चेंडू खरचं सुरेख होते, त्यावर खेळताना पूर्णपणे गडबडलो होतो. त्यामुळे हा पराभव आमच्यासाठी डोळे उघडणारा आहे”, भुवनेश्वर कुमार बोलत होता.

अवश्य वाचा – IND vs NZ : भारताच्या मानहानीकारक पराभवातही युजवेंद्र चहल चमकला

चौथ्या सामन्यात खेळतना संघाला विराट कोहलीची उणीव भासल्याचंही भुवनेश्वर कुमारने मान्य केलं. “प्रत्येक सामन्यात विराटची उणीव ही भासतेच. मात्र तो संघात नसताना शुभमन गिलसारख्या तरुण खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. त्याने आतापर्यंत संघासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे, मात्र आम्हाला प्रत्येक वेळी त्याच्यावर अवलंबून राहता येणार नाही.” या मालिकेतला अखेरचा सामना रविवारी होणार आहे.

अवश्य वाचा – IND vs NZ : कठीण समय येता कोण कामास येतो? नेटकऱ्यांना झाली धोनीची आठवण