टीम इंडियाने न्यूझीलंडच्या संघावर पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून सहज विजय मिळवला. भारताचा ‘गब्बर’ शिखर धवन याने कर्णधार विराट कोहलीसोबत भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला. भारतापुढे न्यूझीलंडने १५६ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने सहज पेलले आणि तब्बल १० वर्षानंतर न्यूझीलंडच्या भूमीत न्यूझीलंडला पराभूत केले.

या विजयानंतर विराट कोहली अतिशय आनंदात होता. सामना संपल्यावर भारतीय संघ मैदानात मजा मस्ती करत असताना कोहलीने ‘सेगवे’ वरून मैदानात एक फेरफटका मारला. त्यानंतर त्याने एक हात डोक्यावर आणि दुसरा हात कंबरेवर ठेवून झकासपैकी ‘धमेंद्र’ स्टाईल डान्सही केला.

दरम्यान, प्रखर सुर्यप्रकाशामुळे हा सामना थांबवण्यात आला होता. त्यामुळे सामन्यातील एक षटक कमी करुन भारताला विजयासाठी दिलेल्या आव्हानात एक धाव कमी करण्यात आली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवातीलाच रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला होता. त्यानंतर धवन आणि कोहली यांनी सामना जिंकवण्यात मोलाची भूमिका बजावली. शिखर धवनने ७५ धावा केल्या. विराट कोहलीनेही त्याला उत्तम साथ दिली, मात्र सामना जिंकायला अवघ्या काही धावा शिल्लक असताना तो झेलबाद होऊन माघारी परतला. त्याचे अर्धशतक ५ धावांनी हुकले.

त्याआधी मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि अन्य भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडला १५७ धावांवर रोखले. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुनरो शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतले. यानंतर एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत असताना कर्णधार केन विल्यमसनने दुसऱ्या बाजूने आपल्या संघाची बाजू लावून धरली. विल्यमसनने ८१ चेंडूत ७ चौकारांसह ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने एकही फलंदाज आपल्या कर्णधाराला साथ देऊ शकला नाही.

भारताकडून कुलदीप यादवने ४ तर मोहम्मद शमीने ३ फलंदाजांना माघारी धाडलं. या दोघांना युझवेंद्र चहलने २ तर केदार जाधवने १ विकेट घेत चांगली साथ दिली. या मालिकेतला दुसरा सामना २६ जानेवारी रोजी होणार आहे.