३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. विशाखापट्टणमच्या मैदानावरील पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मर्यादीत षटकांच्या संघातील सलामीवीर रोहित शर्माला यंदा कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. यावेळी फलंदाजीसाठी रोहित-मयांक जोडीने मैदानात पाऊल ठेवताच एक अनोखा विक्रम त्यांच्या नावे जमा झाला आहे.

तब्बल ४७ वर्षांनंतर दोन नवीन सलामीवीरांनी भारतामध्ये कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय डावाची सुरुवात केली आहे. ४७ वर्षांपूर्वी सुनिल गावसकर आणि रामनाथ पारकर या जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय डावाची सुरुवात करुन दिली होती. भारताचा दुसरा सलामीवीर लोकेश राहुलला त्याच्या खराब कामगिरीमुळे आपलं संघातलं स्थान गमवावं लागलं होतं. मयांकने आतापर्यंत भारताकडून ४ कसोटी सामने खेळले आहेत, ते चारही सामने भारताबाहेर खेळले आहेत. भारतीय मैदानावर मयांकचा हा पहिलाच सामना असणार आहे.