भारतीय कसोटी संघात प्रथमच सलामीवीराची भूमिका बजावणाऱ्या मुंबईकर रोहित शर्माने आपलं नाणं खणखणीत वाजून दाखवलं. मयांक अग्रवालच्या साथीने भारतीय डावाची सुरुवात करताना रोहित शर्माने दीडशतकी खेळीची नोंद केली. कसोटी कारकिर्दीतले ते चौथे शतक ठरले. पण कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून रोहितचे हे पहिलेच शतक ठरले. त्याच्या या शतकामुळे रोहितने एक अनोखा योगायोग साधला.

रोहितने बुधवारी २ ऑक्टोबर २०१९ ला कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून शतक ठोकले. ४ वर्षांपूर्वी रोहितने २ ऑक्टोबर २०१५ मध्ये टी २० क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून शतक ठोकले होते. त्यामुळे तब्बल चार वर्षानंतर रोहितच्या शतकाने अनोखा योगायोग साधला. २ ऑक्टोबर २०१५ ला झालेल्या टी २० सामन्यात रोहितने ६६ चेंडूत १२ चौकार आणि ५ षटकार यांच्या मदतीने पहिले टी २० शतक (१०६) ठोकले होते. तर २ ऑक्टोबर २०१९ ला रोहितने २४४ चेंडूत १७६ धावांची खेळी केली. तसेच, एकदिवसीय, टी २० आणि कसोटी या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून शतक झळकावणारा देखील रोहित शर्मा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.

दरम्यान, विशाखापट्टणम कसोटी सामन्यावर भारतीय संघाने आपली मजबूत पकड बसवली. पहिल्या दिवशी बिनबाद २०२ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर, दुसऱ्या दिवशीही भारतीय फलंदाजांनी आक्रमक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांनी आफ्रिकन गोलंदाजांवर प्रहार करायला सुरुवात केली. मयांक अग्रवालने ८४ धावांवरुन आपलं कसोटी क्रिकेटमधलं पहिलं शतक झळकावलं. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ३१७ धावांची भागीदारी केली. अखेरीस केशव महाराजच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित यष्टीचीत होऊन माघारी परतला. त्याने २४४ चेंडूत १७६ धावा केल्या. त्याच्या या खेळीत २३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.