“कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच सलामीला येऊनही रोहितने चांगली कामगिरी केली. त्यामुळे त्याला सलामीला खेळताना त्याच्या पद्धतीने खेळू द्यायला हवे. आताचा त्याच्या कसोटी कारकिर्दीच्या भविष्याबाबत चर्चा करणं बरोबर नाही. कसोटीत रोहित पुढे काय करणार यावर चर्चा करणं आता साऱ्यांनीच बंद करायला हवं. कारण तो खूप चांगल्या लयीत आहे. त्याला तीच लय कायम ठेवू द्या देणं गरजेचं आहे”, अशा शब्दात विराटने पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तर दिले. भारताची १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान दुसरी कसोटी पुण्यात होणार आहे. त्या कसोटीआधी आज विराटने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी तो बोलत होता.

“पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना रोहित विनादडपण खेळत होता. एवढ्या वर्षे त्याने क्रिकेटमध्ये जे काही अनुभव घेतले त्याचा फायदा करून त्याने आपली खेळी सजवली. सलामीला खेळताना तो अधिक चांगली खेळी करू शकतो असे आम्हा साऱ्यांनाच जाणवले. दुसऱ्या डावात त्याने ज्या प्रकारे खेळ झटपट पुढे नेला, त्यामुळे आमच्या गोलंदाजांना प्रतिस्पर्धी संघाला बाद करण्यासाठी अधिक वेळ मिळाला. त्यामुळे कसोटीतही रोहितला सलामीवीर म्हणून खेळवण्यात संघाला नक्कीच फायदा होईल”, असा विश्वास विराटने व्यक्त केला.

“रोहित अत्यंत चांगल्या लयीत खेळताना दिसतो आहे. त्यामुळे त्याला त्याच्या खेळाचा आनंद घेऊ देणे हाच सध्या आमचा हेतू आहे. त्याच्या खेळीने तो संघाला मोठ्या धावसंख्या उभारून देऊ शकतो याची आम्हाला खात्री आहे”, असेही विराटने नमूद केले.

दरम्यान, रोहित शर्माने पहिल्या डावात २४४ चेंडूत १७६ धावांची धमाकेदार खेळी केली. पहिल्या डावात त्याने २३ चौकार आणि ६ षटकार लगावले. हीच लय कायम राखत त्याने दुसऱ्या सामन्यातदेखील शतक ठोकले. रोहितने दुसऱ्या डावात १४९ चेंडूत १२७ धावांची खेळी केली. या डावात रोहितने १० चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. त्यानुसार त्याने दोनही डावात मिळून ३०३ धावा केल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.