मंगळवारी दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. रोमांचक सामन्यात भारताने श्रीलंकेच्या संघाला तीन गडी राखून पराभूत केले. भारताच्या विजयाचा नायक दीपक चहर होता. चहरने नाबाद ६९ धावा केल्या. आयपीएलमध्ये उत्तम गोलंदाजी करुन चाहत्यांची मने जिंकणाऱ्या चहरने फलंदाजीमध्येही कमाल करुन दाखवली आहे. काही वेळासाठी पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाला दीपक चहरच्या फलंदाजीने तारले आणि विजय मिळवून दिला.

यावेळी दीपक चहरच्या या आक्रमक फलंदाजीबाबत श्रीलंका दौर्‍यादरम्यान भारताचा उपकर्णधार असलेल्या भुवनेश्वर कुमारने मोठा खुलासा केला आहे. भुवनेश्वर कुमार म्हणाला की, दीपक चहरला फलंदाजीसाठी पाठवणे हा संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मास्टरस्ट्रोक होता. चहरला भुवनेश्वरच्या वर फलंदाजीसाठी पाठवले होते.

२७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १९३ वरच ७ गडी गमावले होते. विजयासाठी संघाला ८४ धावांची आवश्यकता होती आणि कृणाल पंड्याची विकेटही टीम इंडियाने गमावली. पण दीपक चहरने शेवटच्या षटकात शानदार फलंदाजी केली आणि भारताला श्रीलंकेविरुद्धच्या नवव्या वन डे मालिकेमध्ये विजय मिळवून दिला. दीपक चहरने याआधीही भारतात एका सामन्यात पन्नास धावा केल्या आहेत. भुवनेश्वर कुमार सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाले की, राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षणाखाली दीपक चहर भारतीय संघासाठी खेळला आहे. त्यामुळे त्यांना माहित होते की दीपक उत्तम फलंदाजी करु शकतो आणि काही मोठे शॉट्स देखील खेळू शकतो.

भुवनेश्वर पुढे म्हणाला की, दीपक चहरला आधी पाठवणे हा राहुल द्रविडचा कॉल होता आणि त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यावरून त्याचा निर्णय योग्य ठरला. चहरने अनेक वेळा रणजी ट्रॉफीमध्ये चांगली फलंदाजी केली आहे, म्हणून हा कठोर निर्णय नव्हता. पण त्याने ज्या प्रकारे धावा केल्या त्या पाहून छान वाटले.” भुवनेश्वर कुमारने दुसर्‍या टोकाला राहून दीपक चहरची चांगली साथ दिली.

भुवनेश्वर कुमार पुढे म्हणाला की, आम्ही जास्त नियोजन केले नाही. आमची कल्पना शेवटपर्यंत खेळण्याची आणि लक्ष्याच्या जवळ जाण्याची होती. पण आम्ही कधी सामना जिंकण्याचा विचार केला नाही. दीपकने ज्या प्रकारे फलंदाजी केली ते आश्चर्यकारक होते.